११ महिन्यात ६१४ दाम्पत्यांचा वंशवाढीला ‘ब्रेक’
By Admin | Updated: January 16, 2016 01:19 IST2016-01-16T01:19:58+5:302016-01-16T01:19:58+5:30
‘हम दो, हमारे दो’ असा संकल्प करीत लोकसंख्या वाढीवर आळा बसविण्यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट ठरवून लोकसंख्येवर काही प्रमाणात लगाम लावला आहे.

११ महिन्यात ६१४ दाम्पत्यांचा वंशवाढीला ‘ब्रेक’
उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : महिलांच्या तुलनेत पुरुषाचा टक्का माघारलेलाच
राजकुमार चुनारकर खडसंगी
‘हम दो, हमारे दो’ असा संकल्प करीत लोकसंख्या वाढीवर आळा बसविण्यासाठी आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट ठरवून लोकसंख्येवर काही प्रमाणात लगाम लावला आहे. चिमूर तालुक्यातील ६१४ दाम्पत्यांनी आरोग्य विभागाच्या हाकेला ‘ओ’ देत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून वंशवाढीला ‘ब्रेक’ लावला आहे.
चिमूर तालुक्याला जिल्हा आरोग्य विभागाने सन २०१५-१६ मध्ये ८९० कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातून अकरा महिन्यात ५७२ महिला तर फक्त ४२ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. या वर्षीच्या उद्दिष्टपूर्तीकडे तालुका आरोग्य विभागाची वाटचाल सुरू असली तरी पुरुषांनी नसबंदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसत आहे.
तालुक्याला असलेल्या उद्दिष्टांपैकी ६१४ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्या तरी त्यामध्ये ५७२ महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाकडे महिलांचा कल वाढता असला तरी महिलांच्या मानाने पुरुष नसबंदीचे प्रमाण नगण्यच आहे. मागील अनेक वर्षापासून पुरुष नसबंदीचे उद्दिष्ट कितीही असले तरी केवळ ५ ते १० टक्केच पुरुष नसबंदी झाली आहे. यामध्ये दोन अपत्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
चिमूर तालुक्याला या सत्रात ८९० कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते त्यापैकी ११ महिन्यांमध्ये ५७२ महिलांनी शस्त्रक्रिया केली. तर सहा आरोग्य केंद्रात ४२ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. त्यामध्ये जांभुळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ पुरुषांनी शस्त्रक्रिया करून उच्चांक गाठला तर खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरुषाने खातेच उघडले नाही. जांभुळघाट खालोखाल नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.
महिलांमध्ये ११ महिन्यात नेरी आरोग्य केंद्रात १२१ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करीत उच्चांक गाठला आहे. तर शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र महिलामध्ये माघारला आहे. सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाच्या कुटुंब नियोजनाच्या हाकेला ‘हाक’ देत ६१४ दाम्पत्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून वंशवाढीला ‘ब्रेक’ देत देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग दाखविला आहे.
पुरुषांच्या शस्त्रक्रियेची सोपी पद्धत
पुरुष नसबंदीसाठी आरोग्य विभागाने प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुरुष शस्त्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत असते. महिलांवर शस्त्रक्रिया केल्यास किमान सात दिवस रुग्णालयात राहावे लागते. तसेच शस्त्रक्रियेनंतर अन्य शारीरिक व्याधी सुरू होण्याचा धोकाही असतो. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया १५ मिनिटात होते. अर्ध्या तासात संबंधित रुग्ण घरी जाऊ शकतो. त्यामुळे पुरुषाला कोणताही त्रास जाणवत नाही. नसबंदी केल्यास शासनाकडून १,५०० रुपयांचे अनुदान मिळते, हे जरी खरे असले तरी आजही याबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे महिलावरच या शस्त्रक्रिया करतात. ११ महिन्यात फक्त ४२ पुरुषांनी नसबंदी केली आहे.
महिलांचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे
बाळंतपण झाल्यानंतर काही महिला कुटुंब नियेजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात. किंबहुना पुरुषांची नसबंदी म्हणजे अघटीत घडते, असा समज अद्यापही अनेक ठिकाणी रुढ आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल महिलासमोर डॉक्टरांनी पुरुष नसबंदीचा प्रस्ताव ठेवला. तर महिलाच त्याला नकार देत असल्याचे चित्र आहे.
प्रबोधन मिळणार कधी?
ज्यावेळी एखादी महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल होते, तेव्हा संबंधित दाम्पत्याचे प्रबोधन घेवून त्यांच्यासमोर विकल्प ठेवले पाहिजेत. संतती नियमन अथवा पुरुष नसबंदी असे विकल्प दिल्यास महिलांना शस्त्रक्रियेचा त्रास होणार नाही. पुरुष शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढविण्यासाठी आता मतपरिवर्तन करणे ही काळाची गरज बनली आहे.