विसापूरच्या हद्दीत साकारतेयं शैक्षणिक हॅब
By Admin | Updated: May 4, 2015 01:21 IST2015-05-04T01:21:13+5:302015-05-04T01:21:13+5:30
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात शैक्षणिक हॅब साकारण्यात येत आहे.

विसापूरच्या हद्दीत साकारतेयं शैक्षणिक हॅब
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात शैक्षणिक हॅब साकारण्यात येत आहे. यात एका खासगी तर तीन शासकीय संस्थाच्या शाळेचा समावेश आहे. यासाठी राजस्व विभागाने १८६ एकर जागा अधीग्रहीत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण केली आहे. यामुळे विसापूरची ओळख शैक्षणिक हॅब म्हणून निर्माण होऊ लागली आहे.
बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गावर सन १९९५-९६ मध्ये सर्व्हे क्रमांक ९०, ९१ व ९२ मधील ४५ एकर जमिनीवर सन्मित्र मंडळाच्या वतीने सैनिकी शाळा सुरू करण्यात आली. येथे १२ वीपर्यंत सुविधा करण्यात आली. याच हद्दीत सर्व्हे क्रमांक १०७/२ मधील ३.२० हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करून दोन वर्षापासून समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलांसाठी निवासी शाळा सुरू आहे. निवासी शाळेला लागून सर्व्हे क्रमांक १०७/१ मधील ४.१२ हेक्टर जमिनीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकारास येत आहे. या आयटीआयचे बांधकाम प्रगतीवर आहे.
विसापूरच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात तब्बल १२३ एकर विस्तारित जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील दुसरी सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी हालचालींनी वेग घेतला आहे. या संदर्भात राज्याच्या मंत्रीमंडळाने ९ एप्रिलला ठराव घेऊन विधानसभेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे सुर्पूद केला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्याचे ले. जनरल राजेंद्र निबोंळकर, प्रभारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, प्रभारी तहसीलदार विकास अहीर यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली.
येथील प्रस्तावित केंद्रीय सैनिकी शाळेसाठी राजस्व विभागाने बल्लारपूर तलाठी साज्यातील सर्व्हे क्रमांक ९४, ९५, ९६, ९७, ९८, १०५, १०८, १०९, ११०, १११, ११३, ११४ मधील एकूण ४९.१५ हेक्टर आर. जमीन उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी राज्य सरकारला दिला आहे. या जागेचे क्षेत्रफळ १२३ एकराचे असल्याचे सांगीतले जात आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने राज्यातील सातारा येथे २३ जून १९६१ ला पहिली सैनिकी शाळा सुरू केली. त्याच धर्तीवर दुसरी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात दुसरी शाळा सुरू होणार आहे.
येथील प्रस्तावित सैनिकी शाळा विदर्भासाठी व नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी विकासात्मक मैलाचा दगड ठरणारी असून राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणूनही ओळखली जाणार आहे. या सैनिकी शाळेच्या माध्यमातून तयार झालेले विद्यार्थी संरक्षण सेवा, पोलीस सेवा, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सामाजिक सेवा यासोबतच आर्मी, नेव्ही व एअरफोर्स सारख्या उच्च पदावर जाण्यास हातभार लावणारे ठरणार आहे.
विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवून देणारे विद्यार्थी सैनिकी शाळेच्या माध्यमातून बाहेर पडणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारीही यातून निर्माण होतील व देशसेवेला यामुळे मदत होणार आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.