बॉम्बच्या अफवेने पोलिसांची तारांबळ
By Admin | Updated: September 6, 2014 01:41 IST2014-09-06T01:41:06+5:302014-09-06T01:41:06+5:30
गुरुवारी रात्री ९ वाजताची वेळ, गिरनार चौकाच्या अलीकडे कस्तुरबा मार्गावर अचानक एक दोरीने बांधलेली सुटकेस बेवारस अवस्थेत सापडते.

बॉम्बच्या अफवेने पोलिसांची तारांबळ
चंद्रपूर : गुरुवारी रात्री ९ वाजताची वेळ, गिरनार चौकाच्या अलीकडे कस्तुरबा मार्गावर अचानक एक दोरीने बांधलेली सुटकेस बेवारस अवस्थेत सापडते. अचानक या सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरते. याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली जाते. गणेशोत्सव सुरू असल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडते. लगेच घटनास्थळी पोलिसांचा ताफा येतो. त्यांनाही सुटकेसमधून कशाचे तरी सिग्नल मिळते आणि मग सर्वांची भंबेरी उडते. निर्जनस्थळी सुटकेस नेऊन उघडल्यानंतर त्यात कपडे आणि मोबाईल मिळाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो. वरकरणी हा प्रकार गंमतीचा वाटत असला तरी या प्रकारामुळे तब्बल अडीच तास लोकांचा श्वास अडकून पडला होता.
२९ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. रस्त्यारस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अनूचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाला अलर्ट करण्यात आले आहे. अशातच काल गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील वर्दळीच्या गिरनार चौकाच्या अलिकडे १०० मीटर अंतरावर एक दोरीने बांधलेली काळी सुटकेस बेवारस पडलेली नागरिकांना दिसली. कोणतीही बेवारस वस्तू दिसली की पोलिसांना फोन करा, अशा आशयाचे फलक शहरात लावले असल्याने नागरिकांनी लगेच याबाबत पोलिसांना कळविले. तोपर्यंत सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा सर्वत्र पसरली. प्रारंभी घटनास्थळी काही पोलीस आले. त्यांनी लगेच बॉम्ब डिस्पोजल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गरभिये यांना पाचारण केले. तेदेखील श्वानपथक व आपल्या ताफ्यासह तिथे पोहचले. बॉम्ब डिटेक्टरने तपासणी केली असता सुटकेसमधून सिग्नल मिळाले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. दरम्यान यावेळपर्यंत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. त्यामुळे बराच वेळ ही सुटकेस तिथेच पडून राहिली. एव्हाना नागरिकांचीही प्रचंड गर्दी घटनास्थळी जमा झाली. काही वेळानंतर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी सुटकेसची पाहणी केल्यानंतर लगेच ही सुटकेस निर्जनस्थळी नेण्याचे आदेश दिले. तोपर्यंत रात्रीचे ११ वाजून गेले होते. त्यानंतर सुटकेस कोहीनूर क्रीडांगण (पूर्वीचे कोनेरी तलाव) येथे नेण्यात आली. तिथे बॉम्ब डिस्पोजल पथकाद्वारे सुटकेस उघडण्यात आली. सुटकेसमध्ये जुने मळलेले कपडे व सीमकार्ड नसलेला जुना मोबाईल आढळला. त्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. (शहर प्रतिनिधी)