लोकसहभागातून घातली दु:खावर फुंकर
By Admin | Updated: July 6, 2014 23:50 IST2014-07-06T23:50:46+5:302014-07-06T23:50:46+5:30
वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीत कार्यरत एका तेलगु भाषिक कामगाराच्या मुलीचे लग्न जुळले. आयुष्याची मोठी जबाबदारी हलाखीच्या परिस्थितीत कशी पार पाडावी, याची चिंता त्यांना अस्वस्थ करायची.

लोकसहभागातून घातली दु:खावर फुंकर
कामगार एकवटले : वधुपित्यावर तिहेरी संकट
गजानन साखरकर - घुग्घुस
वेकोलिच्या मुंगोली कोळसा खाणीत कार्यरत एका तेलगु भाषिक कामगाराच्या मुलीचे लग्न जुळले. आयुष्याची मोठी जबाबदारी हलाखीच्या परिस्थितीत कशी पार पाडावी, याची चिंता त्यांना अस्वस्थ करायची. अशातच त्यांची प्रकृती बिघडली. हैदराबादमध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. उपचाराचा खर्च, मुलीचे लग्न आणि दुसरीकडे दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न, यामुळे ते कोसळलेच. मात्र मुंगोली खाणीच्या कर्मचाऱ्यांनी लोक वर्गणी गोळा करून त्याच्या मुलीचे लग्न लावून दिले. एवढ्यावरच हा जिव्हाळा थांबला नाही तर दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी १५ हजार रुपये होस्टेलची रक्कम लोकवर्गणीतून जमा केली. कामगारांनी दाखविलेला सामाजिक बांधिलकीचा हा प्रत्यय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
कासरला ऐकटी असे या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. ते वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कार्यरत आहेत. आठ महिन्यापूर्वी हैदराबादच्या मुलाशी त्यांच्या मुलीचे लग्न जुळले. मुलीचे लग्न लावून देणे हा वडीलांच्या आयुष्यातील मोठी जबाबदारी. हलाखीची परिस्थिती असली तरी ते या तयारीला लागले. अचानक त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांना हैद्राबादच्या दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले असता कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. महागडा औषधोपचार, मुलीचे तोंडावर आलेले लग्न व दुसऱ्या मुलीचे शिक्षण, यामुळे ते आजाराने खचले नाही, तेवढे खचले. खाणीतील इतर कामगारांना त्यांची ही अवस्था समजली. सर्व कामगार कासरला यांच्या मदतीकरिता समोर आले. लोकवर्गणीतून एक लाख वीस हजार रुपयांची मदत गोळा करण्यात आली. त्यातून त्यांच्या मुलीचा नियोजित विवाह लावून देण्यात आला. त्यांच्या हैद्राबाद येथे शिकत असलेल्या दुसऱ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीही कामगारांनी स्वीकारुन होस्टेलची १५ हजार रुपये फि भरली.