जि.प.मध्ये सर्वसामान्यांची नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:56+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात. दरम्यान, समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर या अ‍ॅपवरून एका बाधिताचादेखील पत्ता लागला आहे.

Blockade of commoners in ZP | जि.प.मध्ये सर्वसामान्यांची नाकेबंदी

जि.प.मध्ये सर्वसामान्यांची नाकेबंदी

ठळक मुद्दे सीईओंचा अजब फतवा : आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजारापासून सामान्य जनतेला दूर ठेवण्यासाठी झटत असणारे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आता त्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांसाठी एक अजबच गळ घातली आहे. मला भेटायचे असेल तर आधी आपल्या फोनवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा, असा फतवाच त्यांनी काढला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये सदर अ‍ॅप नसणाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेत आता नाकेबंदीच झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दररोज शेकडो अभ्यागत विविध कामे घेऊन येतात. दरम्यान, समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर या अ‍ॅपवरून एका बाधिताचादेखील पत्ता लागला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्राईड मोबाईल फोन असणाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेताना त्यांच्याकडे आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला आहे का, हे आता तपासले जाणार आहे. सामान्य नागरिक, कर्मचारी गावातील, क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेटी घेतात. कोविड-१९ मुळे खबरदारी म्हणून मास्क वापरणे कार्यालयात बंधनकारक केले आहे. तसेच सॅनिटायझर, वॉश बेसिन इत्यादींची व्यवस्था केलेली आहे. इथपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे असले तरी ती बाब ऐच्छिक आहे. मात्र सीईओंनी तर याची सक्तीच केली आहे. एखाद्याला ते अ‍ॅप डाऊनलोड करायचे नसेल तर त्याच्या अडचणीचे आता जिल्हा परिषदेकडून निराकरण होणार नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. स्पार्ट फोनधारकांनी आरोग्य सेतूचा वापर जास्त प्रमाणात करावा, यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा अनेक नागरिक आरोग्य सेतूचा वापर कमी प्रमाणात करताना दिसत आहे. त्यामुळे सीईओंनी असा आदेश काढला.

इतर अधिकाऱ्यांनाही तशाच सूचना
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गठित केलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी केवळ स्वत:साठीच ही गळ घातली नसून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना भेटायला येणाऱ्या अभ्यागतांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करावे, अशा सूचनादेखील कर्डिले यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद चंद्रपूरचे अधिनस्त सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी तसेच इतर कार्यालय प्रमुख यांचीसुद्धा भेट घेताना स्मार्टफोन धारकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे आता आवश्यक आहे. याविषयीची माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यालयाने जारी केली आहे.

मला कार्यालयात भेटणाऱ्या अभ्यागतांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप डॉऊनलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, एवढाच यामागे हेतू आहे.
-राहुल कर्डिले,
सीईओ, जि.प. चंद्रपूर.

Web Title: Blockade of commoners in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.