भाजप व मित्र पक्षाचे वर्चस्व
By Admin | Updated: October 4, 2014 23:23 IST2014-10-04T23:23:43+5:302014-10-04T23:23:43+5:30
जिल्हा परिषद सभापतिपदासाठी शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा व मित्र पक्षाने चारही सभापतिपदावर ताबा मिळविला असून यात दोन भाजपाचे तर, शिवसेना, शेतकरी संघटनेने प्रत्येकीे

भाजप व मित्र पक्षाचे वर्चस्व
जि.प. सभापती निवडणूक : भाजपाला दोन तर सेना, संघटनेला प्रत्येकी एक सभापतिपद
चंद्रपूर: जिल्हा परिषद सभापतिपदासाठी शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा व मित्र पक्षाने चारही सभापतिपदावर ताबा मिळविला असून यात दोन भाजपाचे तर, शिवसेना, शेतकरी संघटनेने प्रत्येकीे एका पदावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यात शेतकरी संघटनेचे नीळकंठ कोरांगे यांची समाजकल्याण सभापती तर शिवसेनेच्या सरिता नीलकंठ कुडे यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपद मिळाले. भाजपाचे देवराव भोंगळे, भाजपा समर्थित युवाशक्ती संघटनेचे ईश्वर मेश्राम यांचीही सभापतिपदासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र या दोघांना अद्यापही खाते देण्यात आले नाही. बांधकाम सभापतिपद देवराव भोंगळे यांच्याकडे तर, कृषी सभापती म्हणून ईश्वर मेश्राम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
शनिवारी पार पडलेल्या सभापतीच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य अनुपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या सरिता कुडे यांना २९ मते पडले तर अन्य सदस्यांना २८ मते मिळाली.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत गुरु यांनी कुडे यांना आपले मत दिल्याने त्यांना २९ मते मिळाल्याची माहिती मिळाली आहे. सभापतिपदासाठी निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे अविनाश जाधव यांना २० , दिनेश चिटणूरवार यांना १८, पंकज पवार यांना ८, अमर बोडलावार यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेना, शेतकरी संघटना, मनसे, युवाशक्ती संघटनेसोबत युती केली. तसेच राष्ट्रवादीच्या एका सदस्याला आपल्या गोठात आणून सत्ता मिळवीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळविले.
काँग्रेसकडे २१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य असे एकूण २८ सदस्य होते. त्यांना सत्ता मिळविण्यासाठी केवळ एका सदस्याची गरज असतानाही ते मिळविता आला नाही. एवढेच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य फोडण्यास भाजपाला यश आले आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळविली. (नगर प्रतिनिधी)