भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST2021-09-24T05:00:00+5:302021-09-24T05:00:46+5:30

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर या कृती आराखड्यात देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठ जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली.

Bhanamati, prepared an action plan to prevent inhuman incidents from witchcraft | भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जादूटोणा, भानामतीच्या संशयावरून चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनांमुळे राज्यच नव्हेतर, देश सुन्न झाला. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे यांनी हा कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. 
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर या कृती आराखड्यात देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठ जणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर नागभीड तालुक्यात दोन, चंद्रपूर आणि अलीकडेच चिमूर तालुक्यात आंगणवाडी केंद्रात पूजेचे लिंबू फेकण्याचा प्रकार घडला. अशा घटनांवर आळा घालण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृती आराखड्यासाठी पुढाकार घेतला. याची जबाबदारी गेल्या ३० वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाने कार्य करीत असलेले हरीभाऊ पाथोडे यांच्यावर सोपविली होती.  चंद्रपूर जिल्ह्यात कृती आराखडा यशस्वी झाल्यानंतर हा पॅटर्न राज्यात राबविण्याचा मानस वडेट्टीवारांचा आहे. या कृती आराखड्यावर पुढील कार्यवाहीची जबाबदारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सामाजिक न्याय विभागाला दिलेली आहे. 

असा आहे कृती आराखडा

जादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, दलित प्रतिनिधी, मागासवर्गीयांचा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी असा सात ते आठ जणांचा समावेश असेल. 
या कृती दलाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची रूपरेषाही सादर केली आहे. ३० ते ३५ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारी मंडळी हे प्रशिक्षण देतील. नंतर असेच कृती दल जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तयार केले जाईल.
गावागावांत सामूहिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दल तयार झाले तर या माध्यमातून जादूटोणाविरोधी विधेयक २०१३ हेसुद्धा जनतेला माहिती होईल. ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यावर प्रबोधन होईल, या अनुषंगाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेवरून कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
- हरीभाऊ पाथोडे, राज्य संघटक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर.

 

Web Title: Bhanamati, prepared an action plan to prevent inhuman incidents from witchcraft