विदर्भाच्या रोहितची सातासमुद्रापार झेप; दुबईत क्रिकेट खेळासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 17:34 IST2021-10-25T15:29:04+5:302021-10-25T17:34:37+5:30
भद्रावती शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बरांज तांडा या मागासलेल्या गावातील व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी कला या वर्गातील १६ वर्षीय रोहित रवींद्र नागपुरे या विद्यार्थ्याची भारत देशाबाहेरील दुबई या देशाच्या शारजहाँ येथे क्रिकेट खेळासाठी निवड झाली. तो ८ नोव्हेंबरला रवाना होणार आहे.

विदर्भाच्या रोहितची सातासमुद्रापार झेप; दुबईत क्रिकेट खेळासाठी निवड
चंद्रपूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भद्रावतीच्या रोहित नागपुरेने अखेर आपले क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याची दुबइतील शारजहाँ शारजहाँ येथे क्रिकेट खेळासाठी निवड झाली. तो ८ नोव्हेंबरला रवाना होणार आहे.
भद्रावती शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बरांज तांडा या मागासलेल्या गावातील व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी कला या वर्गातील १६ वर्षीय रोहित रवींद्र नागपुरे याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. घरची परिस्थिती बेताची, डोक्यावरुन आईचा हात कधीचाच नाहीसा झाला. मात्र, अनेक संकटांचा सामना करत त्याने आपली आवड जोपासली.
भद्रावती तालुक्यातील व शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेला बरांज तांडा. ही अतिशय मागासलेली लोकवस्ती आहे. येथे राहणारा १६ वर्षीय रोहित रवींद्र नागपुरे याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. तो सध्या लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला या वर्गात शिकतो. आईचे छत्र हरपलेल्या रोहित हा आजी-आजोबा, वडील व आपल्या लहान बहिणीसोबत राहतो. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाची आवड आहे. वडील रवींद्र राहू नागपुरे हे गवंडी काम करून परिवाराचे लालनपालन व मुलांच्या शिक्षणाचा खर्च करीत आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीवर रोहितने मात करून आपल्या यशाचे शिखर गाठले.
सर्वप्रथम क्रिकेटच्या ट्रायलकरिता हैदराबादच्या उपल येथे निवड होऊन गोवा येथे निवड झाली. तेथे तो तीन मॅच खेळला. यामध्ये पाच गडी बाद करून ''प्ले ऑफ द मॅच''द्वारे भ्रमणध्वनी संच प्राप्त केला. त्याने पहिल्याच सामन्यामध्ये चार गडी बाद केले. तेथे खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये सरस राहिल्याने आता दुबई देशातील शारजहाँ येथे निवड झाली आहे. त्याच्यासोबत जिल्ह्यातील नागभीड येथील येशुराज नायडू व वंश मुनघाटे या दोघांचीदेखील दुबईकरिता निवड झाली. दुबईला जाण्यापूर्वी चार दिवस दिल्ली येथे सराव मॅच होईल, नंतर ते दुबईकरिता रवाना होणार आहेत.