भद्रावतीत ‘जी प्लस टू’ अद्ययावत भाजीमंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 01:16 IST2017-05-19T01:16:56+5:302017-05-19T01:16:56+5:30
भद्रावती नगरपालिकेद्वारे वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत अद्ययावत भाजी मार्केट व्यापारी संकुलाचे बांधकाम

भद्रावतीत ‘जी प्लस टू’ अद्ययावत भाजीमंडी
भद्रावती पालिकेचा उपक्रम : १२४ गाळे, १० कोटींचे बांधकाम, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती नगरपालिकेद्वारे वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत अद्ययावत भाजी मार्केट व्यापारी संकुलाचे बांधकाम दैनिक गुजरी येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी १४ लाख ४६ हजार रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ‘जी प्लस टू’ इमारत असणार असून यात एकूण १२४ गाळे असणार आहे. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसुध्दा करण्यात येणार आहे.
१५ ते १८ मेपर्यंत दैनिक गुजरीतील जुने व्यापाऱ्यांनी तयार केलेले सर्व शेड्स हटविण्यात आले असून अतिक्रमण हटाव मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. इमारत पूर्ण होईपर्यंत नगरपालिकाद्वारे जवळच या दुकानदारांना जागा देण्यात आली आहे.
अतिक्रमण हटविताना प्रामुख्याने नगराध्यक्ष अनिल धानोरकर मुख्याधिकारी विनोद जाधव, न.प. कर्मचारी तसेच ठाणेदार विलास निब्रड उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या इमारतीमुळे न.प.चे उत्पन्न वाढणार असून यात पहिल्या माळ्यावर भाजीमंडी, दुसऱ्या माळ्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स व तिसऱ्यावर अन्य कार्यालये बांधण्यात येणार आहे. यामध्ये भूूमिगत पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार असून स्वच्छतेबाबत विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. एकूण जागा ५३०० चौरसमीटर असून ३१८३-५३ चौ.मीटर जागेवर बांधकाम होणार आहे. यामुळे मार्केट वाढून पर्यायाने शेतकऱ्यांचाही फ ायदा होणार आहे. दररोज सध्याच्या जागेवर भाजीमंडीत १८ ते २० मिनीट्रक व बुधवारला ६० ते ७० मिनीट्रक येत होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत होती. परंतु नविन इमारतीत वाहनांसाठी भूमिगत पार्र्कींग असल्याने गैरसोय टाळता येणार आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार असून मॉलप्रमाणे हे कॉम्प्लेक्स असणार आहे.
विखुरलेल्या दुकानदारांना या ठिकाणी गाळे मिळणार असून जुन्या दुकानदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या भाजीमंडीला गुंडावार लॉन समोर जागा देण्यात आली आहे. त्याठिकाणी ले-आऊट टाकून मुरूमाचे रस्ते, पाणी, वीज व्यवस्था न.प.द्वारे करण्यात आली आहे. भद्रावतीच्या विकास कामाचा हा एक महत्वाचा टप्पा असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.