जिल्हा प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक
By Admin | Updated: April 29, 2015 01:16 IST2015-04-29T01:16:13+5:302015-04-29T01:16:13+5:30
जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती.

जिल्हा प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक
जिवती : जिवती तालुक्याच्या निर्मितीपूर्वी या तालुक्यातील नागरिक गेली अनेक वर्षे हालअपेष्टा सहन करीेत आयुष्य जगत होती. तालुका निर्मितीनंतर यात फरक पडेल असे वाटत होते. मात्र तालुका झाल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रशासन या तालुक्याला सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे. विकासात सर्वाधिक महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रस्त्यांचीच संपूर्ण तालुक्यात दैना झाली आहे. या तालुक्यातील अर्ध्याही खेड्यात अजूनपर्यंत रस्तेच पोहचले नाहीत. यामुळेच संपूर्ण तालुक्याचा विकास खुंटला आहे.
या तालुक्यातील डोंगरदऱ्यात वस्त्या करून नागरिक वास्तव्य करीत आहेत. पण अजूनही त्यांचे जीवनमान बदलले नाही. आहे त्याच स्थितीत उदरनिर्वाह करीत आहेत. जिवती तालुका आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. आदिवासी व मागासलेला दुर्गम तालुका म्हणून येथे शासकीय कर्मचारीसुद्धा येण्यासाठी तयार नसतात. परिणामी विकासाला खीळ बसत आहे.
‘गाव तिथे रस्ता’ असे शासनाचे ब्रिद असताना मात्र येथील खेड्यात अजूनही बऱ्याचठिकाणी रस्ते पोहोचलेच नाहीत, ही शोकांतिका आहे. प्रत्येक गावाला रस्ता जोडला तर त्या गावाचा विकासही झपाट्याने होतो. पण इथे रस्ताही नाही आणि दळणवळणाचे साधनही नाही. एखाद्या रुग्णाला बैलबंडीवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. खडकी, रायपूर, शंकरलोधी, सोरेकसा, नोकवाडा, नारायणगुडा, धनकदेवी, महापांढरवाणी, भुरी येसापूर, लेंडीजाळा, कमलापूर अशा अनेक खेड्यात अद्याप रस्तेच नाहीत. खेड्यातच रस्ते नसतील तर तालुक्याचा विकास कसा होणार? असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे.
रस्ता नसल्याने दळणवळणाच्या सोयी नाहीत, अशा परिस्थितीत गावाचा विकास कसा होणा जनतेची कामे कशी होणार रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा कशा मिळणार या प्रश्नाचे उत्तर संबंधित प्रशासनानेच द्यावे, लोकप्रतिनिधींनाही याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एकंदरीत रस्त्याअभावी संपूर्ण तालुक्याचाच विकास खुंटला आहे. (शहर प्रतिनिधी)