सावधान! जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:52+5:30
नवीन वर्ष सुरू होताच जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. शेजारी असलेल्या गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यात नागरिकांची सारखी वर्दळ असते. नागपूरला जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सोबतच गडचिरोली येथे विद्यापीठ तसेच नोकरीनिमित्त जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे.

सावधान! जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्यात पुन्हा ३१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने कोरोना ॲटिव्ह रुग्णांचा आकडा आता ६० वर पोहोचला आहे. दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वेळीच सजग होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. विशेष म्हणजे, शेजारी असलेल्या नागपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काळजीत अधिकच भर पडली आहे.
नवीन वर्ष सुरू होताच जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. शेजारी असलेल्या गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यात नागरिकांची सारखी वर्दळ असते. नागपूरला जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सोबतच गडचिरोली येथे विद्यापीठ तसेच नोकरीनिमित्त जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे. शेजारील जिल्ह्यातील रुग्णसंख्याही चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची काळजी वाढविणारी आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात ८ लाख ३ हजार ४०६ तपासणी करण्यात आली असून यातील ७ लाख १३ हजार ५० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वेळीच सर्तक राहणे गरजेचे आहे.
निर्बंध नको असेल तर नियमांचे पालन करा
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे, मात्र नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्कचा वापर करणे देखील अनेक जण टाळत आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांना गर्दी करीत आहेत. यामुळे संसर्गात पुन्हा वाढ होऊन कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. निर्बंध नको असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे.
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घ्यावी.
-अजय गुल्हाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर
वेळीच व्हा दक्ष
बुधवारी आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात २४, बल्लारपूर २, राजुरा २, चंद्रपूर १, भद्रावती १, तर चिमूर येथे एक रुग्ण आढळून आला. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे. चंद्रपूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आहे.