पुनर्वसन रखडल्याने बरांजला धोका
By Admin | Updated: August 3, 2014 23:16 IST2014-08-03T23:16:48+5:302014-08-03T23:16:48+5:30
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा

पुनर्वसन रखडल्याने बरांजला धोका
प्रशासन गंभीर नाही : संपूर्ण गावच नष्ट होण्याची भीती
विनायक येसेकर - भद्रावती
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीच्या उत्खननामुळे बरांज (मोकासा) या गाव संकटात सापडले आहे. या गावाची लोकसंख्या १६०० ते १७०० एवढी आहे. गावाच्या सभोवताल खाणीचा परिसर व मातीचे ढिगारे असल्याने दरवर्षी या गावाला पुराचा वेढा असतो. अतिवृष्टी झाली तर हे संपूर्ण गाव नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे या गावाचे तात्काळ पुनर्वसन करा, अशी मागणी आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असल्याने बरांजवरील जीवघेणा धोका कायम आहे.
बरांज (मोकासा) येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे निवेदन देत आहेत. यासाठी अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. परंतु जिल्हा प्रशासन त्यांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या गावाला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा गावकरी किती धोक्यात जीव जगत आहे, हे दिसून आले. एम्टा या कोळसा खाणीच्या दुसऱ्या फेसचे जोरात काम चालू आहे. पहिल्या फेसच्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याने या गावाला आधीच वेढले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण गावच पाण्याने वेढले होते. त्यावेळी प्रशासनाने त्यांना बाहेर काढण्याकरिता स्वयंचलीत बोटीचा वापर केला होता. यावर्षी दुसऱ्या फेसचे उत्खनन सुरू झाले असून खाणीतून निघणाऱ्या मातीचा गावाला लागूनच दुसऱ्या भागाने डोंगर उभा केला जात आहे. हे उत्खनन गावातील एक रस्ता सोडता चारही बाजूने सुरु आहे. याठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व नवीन वस्ती खाणीच्या अगदी काठावर आल्याने भविष्यात खाणीची दरड कोसळल्यास अख्खे गावच खाणीत कोसळून मोठी प्राणहानी व वित्तहानी होऊ शकते. गावाच्या इतर भागाकडे उंच मातीचे ढिगारे असल्याने तेसुद्धा अती पावसाने गावावर कोसळून गाव ढिगाऱ्याखाली गाडले जाऊ शकते, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. अविवृष्टी झाली तर पुराचा जोर वाढून गाव बुडण्याची शक्यताही आहे. खुद्द गावकऱ्यांनीच ही भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलीत. मात्र काहीही उपयोग झाला नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या गावाचे सुरक्षित जागी पुनर्वसन करावे, अशी आर्त मागणी गावकरी करीत आहेत. या संदर्भात कर्नाटका एम्टामधील एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यांच्या बाजुने कंपनीने मोठे नाले केले असल्याचे सांगितले.