बल्लारपूर : येथील क्रिसेंट पब्लिक स्कूल बल्लारपूर ( महाराष्ट्र ) मध्ये शिकणाऱ्या पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी उन्नती नथानी हिची युनोस्कोद्वारा जल दिन प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या स्पर्धेत " क्रिएटिव्ह अवॉर्ड विनर " विजेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही घोषणा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक या जागतिक संघटनेने केली आहे.
जगात प्रसिद्ध असलेली युनेस्को या जागतिक संस्थेच्या वतीने क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांसाठी जागतिक जलदिन या विषयावर एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशातील सर्व राज्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामधून १७ विद्यार्थ्यांची क्रिएटिव्ह अवॉर्डसाठी निवड करण्यात आली. यापैकी तीन विद्यार्थ्यांना पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस देण्यात आले, तर चार दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रिएटिव्ह विद्यार्थी म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच १० मुलांना क्रिएटिव्ह अवॉर्ड देण्यात आले. त्यामधून बल्लारपूरच्या क्रिसेंट पब्लिक स्कूलची पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी उन्नती नथानी हिची निवड झाल्याचे शाळेचे संचालक ॲड. नाजीम खान यांनी सांगितले.