बल्लारपूर नगरपालिकेची निवडणूक सात महिन्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:55+5:302021-04-23T04:29:55+5:30
वसंत खेडेकर बल्लारपूर : निवडणूक लोकसभा, विधानसभा वा महानगरपालिका किंवा नगरपालिकेची असो, त्याची चर्चा ती होण्याच्या एक वर्षापासून सुरू ...

बल्लारपूर नगरपालिकेची निवडणूक सात महिन्यांवर
वसंत खेडेकर
बल्लारपूर : निवडणूक लोकसभा, विधानसभा वा महानगरपालिका किंवा नगरपालिकेची असो, त्याची चर्चा ती होण्याच्या एक वर्षापासून सुरू होते. इच्छुक तयारीला लागतात. बल्लारपूर नगरपालिकेच्या चालू सत्राची मुदत यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपणार असल्यामुळे या नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सात महिन्यांनंतर होणे निश्चित आहे. ही निवडणूक अवघ्या सात महिन्यांवर आली असताना ना तिची कुठे चर्चा आहे, ना कुठे कुणाची तयारी दिसून येत आहे. त्याचे कारण झपाट्याने आलेल्या कोरोनाची दुसरी लाट हे आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर स्थिती सामान्य होताच नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली होती. विद्यमान नगरसेवकांनी परत वॉर्डामधील समस्यांकडे लक्ष देणे आणि मतदारांशी संपर्क साधणे सुरू केले होते. नवीन इच्छुक यांनीही आपण कोणत्या वॉर्डातून उभे राहू म्हणजे निवडून येऊ शकतो, याचा शोध घेणे आणि उमेदवारीकरिता राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधणे सुरू केले होते. अशा बेतातच कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने आली आणि निवडणुकीची चर्चा मागे पडली. तयारीचेही काम थांबले आहे. नगरपालिकेचा पुढील सत्राचा नगराध्यक्ष थेट जनतेच्या मतांवर न निवडता तो नगरसेवकांमधून निवडला जाणार तसेच प्रभाग पद्धत बंद होऊन वॉर्ड पद्धतीतून प्रत्येक वॉर्डातून एक नगरसेवक निवडला जाणार असल्यामुळे पुढील सत्रात नगरसेवकाला महत्त्व येणार आहे. त्याकरिता नगरसेवक होण्याकरिता बरेच जण मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी, कोरोना हद्दपार होणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य बरेचसे उमेदवार कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपापल्या परीने योगदान देत असल्याचे दिसून येत आहे.