बाबासाहेबांचा अस्थिकलश दीक्षाभूमीला सुपूर्द करावा
By Admin | Updated: October 18, 2014 01:19 IST2014-10-18T01:19:11+5:302014-10-18T01:19:11+5:30
बॅरि.साहेबांच्या निर्वाणानंतर दीक्षाभूमीवरील विहाराचे बांधकाम पूर्णत्वास आले नसल्याने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ..

बाबासाहेबांचा अस्थिकलश दीक्षाभूमीला सुपूर्द करावा
चंद्रपूर : बॅरि.साहेबांच्या निर्वाणानंतर दीक्षाभूमीवरील विहाराचे बांधकाम पूर्णत्वास आले नसल्याने बाबासाहेबांच्या अस्थिकलशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने बाबासाहेबांचा अस्थिकलश बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनात ठेवण्यात आला. ज्यादिवशी दीक्षाभूमीवरील बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास येईल त्यावेळी बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश दीक्षाभूमी चंद्रपूर स्थित बुद्ध विहारात बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या दर्शनार्थ कायम स्वरूपी देण्यात येईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने दीक्षाभूमी स्थित बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्णत्वास आणले आहे. येथे १६.५ फुट चालत्या अवस्थेत (अभय मुद्रा) असणाऱ्या बुद्धरूपाची प्रतिष्ठापना केली आहे आणि बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे संरक्षण करण्यास दीक्षाभूमी सक्षम आहे. त्यामुळे बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या भावनांचा आदर करून खोबरागडे परिवाराच्या अधिनस्थ असलेला डॉ. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश बुद्ध-आंबेडकरी अनुयायांच्या दर्शनार्थ कायम स्वरूपी दीक्षाभूमीतील बुद्ध विहारास सुपूर्द करावा, अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी ५८ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धम्मचारी अमोघसिद्धी तर विशेष अतिथी भिक्खु विनयबोधी प्रिय, एल.आर. बाली, चंचल मल, प्राचार्य संजय वानखेडे, डॉ. हृषीकेश कांबळे, प्रा. सुधीर अनवले, मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य चंदू मेश्राम, सदस्य राकेश गेडाम, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, धम्मत्रि शैलेंद्र शेंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी भिक्खू बोधीप्रिय यांनी भगवान बुद्धाचा धम्म हा माणसाला निरंतन प्रसन्नता व चिरस्थायी आनंद देणारा असल्याचे सांगितले. तर धम्मचारी अमोघसिद्धी यांनी बुद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही खरी मानवसेवा आहे. यामाध्यमातून चळवळ गतीमान होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी एल.आर. बाली, प्राचार्य संजय वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनोज सोनटक्के यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव वामनराव मोडक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)