Awareness for control of spray poisoning | फवारणीच्या विषबाधेवर नियंत्रणासाठी जनजागृती
फवारणीच्या विषबाधेवर नियंत्रणासाठी जनजागृती

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घ्यावी काळजी : मागील वर्र्षाची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कृषी तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात येत असून मागील दोन वर्षात झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.
कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने मागील दोन वर्षांमध्ये अनेक शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. विदर्भात हा आकडा ४३ वर पोहोचला होता. एक हजार ८०० शेतकरी, शेतमजूर बाधित झाले होते. हा प्रकार दिल्लीपर्यंत पोहोचला. संपूर्ण प्रशासन हादरले. यावर अनेक उपाय करण्यात आले. २०१८ मध्येही उपायांची मालिका सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे विषबाधा बळीचे प्रमाण कमी झाले. आता चालू हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजूरांना बाधा होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतमजुरांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामार्फत विशेष अभियान राबविले जाणार आहे असून जनजागृती केली जाणार आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात फवारणी प्रशिक्षण तसेच जनजागृती
ब्रह्मपुरी तालुक्यात एकूण २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार हेक्टर क्षेत्र हे धान पिकाखाली आहे. तालुक्यातील गांगलवाडी, बरडकिन्ही, गोगाव व आवाळगाव येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे धान तसेच इतर पिकांच्या लागवडीस उशीर झाला आहे. सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर किड व रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. किड व रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करतात. किटकनाशके फवारणी करताना विषबाधा होऊ नये तसेच विविध पिकांवरील कीड व रोग तसेच कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत मेंडकी येथे २८ आॅगस्टला सकाळी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच विविध पिकांवरील कीड व रोग नियंत्रणाबाबत शेतकºयांमध्ये कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी जनजागृती करणार आहे. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी घ्यायची दक्षता तसेच कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

Web Title: Awareness for control of spray poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.