तालुकास्थळी ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:27+5:302021-04-22T04:29:27+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत ...

तालुकास्थळी ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहातील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे तातडीने करावयाच्या उपाययोजनांसाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दोन दिवसांपासून जिल्हास्थळी ठाण मांडून अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लॉन्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून ठेवावी, ऑक्सिजन बेड्स, पाणी व विजेची व्यवस्था विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
आता प्रत्येक पीएससीत कोविड केअर सेंटर
जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी किमान दहा ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकाऱ्यांनी यादृष्टीने तातडीने नियोजन करावे. यावेळी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी संबंधित तालुक्यातील महत्त्वाचे मुद्दे मांडल्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी निराकरण केले.
रुग्णांशी गैरसोय झाल्यास थेट संपर्क साधा
कोरोना संकटाच्या काळात कोणत्याही रुग्णांची गैरसोय होता कामा नये.
तसे आढळल्यास तातडीने माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले. जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान ग्रामीण भागातील अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने उघडी असतात. त्यामुळे तलाठी, ग्रामसेवकांनी दुकानांवर नियंत्रण ठेवावे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.