चाकूने प्रेयसीचा गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न; माणिकगड किल्ल्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 20:30 IST2022-05-24T20:29:47+5:302022-05-24T20:30:22+5:30
Chandrapur News लग्नास नकार दिल्याने प्रियकराने चाकूने प्रेयसीचा गळा चिरला. यानंतर त्याने स्वत:च्या हाताच्या मनगटावर चाकूने घाव घातला. सोमवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर घडलेली घटना मंगळवारी पुढे आली.

चाकूने प्रेयसीचा गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न; माणिकगड किल्ल्यावरील घटना
चंद्रपूर : लग्नास नकार दिल्याने प्रियकराने चाकूने प्रेयसीचा गळा चिरला. यानंतर ती रक्तबंबाळ होताच त्याने स्वत:च्या हाताच्या मनगटावर चाकूने घाव घातला. सोमवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर घडलेली घटना मंगळवारी पुढे आली. या प्रकरणी जिवती पोलीस ठाण्याने प्रियकर अजय कांबळे (२१, रा. गडचांदूर) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या घटनेने गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अजय कांबळे हा आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन माणिकगड किल्ल्यावर सोमवारी दुपारी गेला. दरम्यान, अजयने प्रेयसीकडे लग्नाची मागणी घातली. परंतु प्रेयसीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने अजय संतापला. त्याने रागाच्या भरात सोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर घाव घातला. यामध्ये गळा १० सें.मी. चिरला असल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले. नंतर त्याने स्वतःच्या हातावर, मनगटावर चाकूने घाव घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. बराच वेळ दोघेही तिथेच होते. किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांना हे दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. त्यांनी लगेच एका मजुराला बोलावून त्याच्या साहाय्याने किल्ल्यावरून दोघांनाही खाली आणले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना जिवती प्राथमिक केंद्रात नेले. तेथून प्राथमिक उपचार करून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्राचे म्हणणे आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.