विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण
By Admin | Updated: December 1, 2014 22:51 IST2014-12-01T22:51:14+5:302014-12-01T22:51:14+5:30
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर,

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाद्वारेही मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी एवढेच नाही तर, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांचे प्रयत्न जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कमी पडण्याची शक्यता आहे. पंधरा पंचायत समितीपैकी तब्बल १२ पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी प्रभारी आहे.
जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. तो दर्जा सुधारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. यासाठी विविध उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहे. कोणत्याही परिस्थिती खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी पडता कामा नये, यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
एवढेच नाही तर शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीसाठी एकाच दिवशी काही तालु्क्यातील विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात आली. त्याचा निकाल अद्याप लागला नाही. निकालानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. हे सर्व ठिक असले तरी जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षक यांच्यातील दुवा असलेल्या जिल्ह्यातील १५ पैकी १२ गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. रिक्त असलेले पद प्रभारींच्या भरोवश्यावर आहे.
प्रभारी अधिकारी असल्याने त्यांचा प्रशासकीय कामावर पाहिेजे तसा वचक नाही. एवढेच नाही तर येथेही सेवाज्येष्ठतेला तिरांजली देण्यात आली आहे. मनमर्जीप्रमाणे प्रभार देवून ज्येष्ठांना डावलण्यात आल्याचा प्रकारही घडत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या प्रकारामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या शिक्षक नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावरून आखण्यात आलेल्या विविध गुणवत्ता विषयक तसेच अन्य योजना प्रभावीपणे राबविण्यात अडचण निर्माण होत आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे अधिकारी बघत असलेले स्वप्न भविष्यात अधुरे राहतील की काय, असा प्रश्न आता नागरिकांत विचारला जात आहे.