मारहाण करून चंद्रपूरच्या बसवाहकाला लुटले, गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 20:50 IST2017-11-09T20:49:38+5:302017-11-09T20:50:03+5:30
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेल्या खासगी बसच्या वाहकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळची रक्कम लुटणा-या तिघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

मारहाण करून चंद्रपूरच्या बसवाहकाला लुटले, गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेल्या खासगी बसच्या वाहकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळची रक्कम लुटणा-या तिघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. विकासनगर, सावली (जि. चंद्रपूर) येथील राजू दितुराम गंगवाणी (वय ४७) हे एमएच ३१/ सीई ०५५५ क्रमांकाच्या खासगी (ट्रॅव्हल्स) बसवर वाहक आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सहल घेऊन ते चंद्रपूर जिल्ह्यातून शेगावला गेले होते. बुधवारी सायंकाळी ते नागपुरात परत आले. विद्यार्थ्यांना येथील रमण सायन्स केंद्र दाखवायचे होते. मात्र, सायंकाळ झाल्यामुळे त्यांनी मुक्कामाचा निर्णय घेतला. रमन सायन्स केंद्राच्या बाजूलाच एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तर, गंगवाणी बाजुला बस उभी करून बसमध्येच झोपले.
रात्री १०.३० च्या सुमारास आरोपी तनवीर हुसेन उर्फ तन्नू साबीर हुसेन (वय २८), रहीम खान फारूक खान (वय १८) आणि अब्दुल रहमान अख्तर अली (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) तेथे आले. त्यांनी गंगवाणीला झोपेतून जागे केले. ही बस कुणाची आहे, येथे कशी लावली, अशा प्रकारे दमदाटी करीत त्यांनी गंगवाणीला मारहाण केली. आरोपींसोबत बचावासाठी झटापट करताना गंगवाणी खाली पडले. ती संधी साधून आरोपींनी त्यांच्या खिशातील ४५०० रुपये हिसकावून पळ काढला. जाताना आरोपींनी बसची काचही फोडली. दरम्यान, आरडाओरड ऐकून बसचालक आणि अन्य जण तेथे जमा झाले. नागरिकांनी या घटनेची तक्रार गणेशपेठ ठाण्यात नोंदविण्याचा सल्ला देऊन पोलीस ठाण्याचा पत्ताही सांगितला. त्यानुसार गंगवानी यांनी ठाण्यात तक्रार नोंदवली.
काही वेळेतच गवसले आरोपी
पोलिसांनी घटना तसेच आरोपींचे वर्णन ऐकून घेतल्यानंतर लगेच बाजूला असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीकडे धाव घेतली. त्या भागात आरोपी नजरेस पडताच गंगवाणीने त्यांची ओळख पटविली. त्यानुसार उपरोक्त तिघांनाही अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.