अभियांत्रिकी पदविकेसाठी आता मराठीतूनही उत्तरे लिहिता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:05 IST2021-07-20T11:03:28+5:302021-07-20T11:05:31+5:30
Nagpur News द्विभाषिक अभ्यासक्रम प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना यापुढे मराठीतूनही उत्तरे लिहिण्याची संधी मिळणार आहे.

अभियांत्रिकी पदविकेसाठी आता मराठीतूनही उत्तरे लिहिता येणार
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पात्रतेत बदल करण्याची घोषणा राज्याचे तंंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, शिक्षणतज्ज्ञांमधील काही मतभेद पुढे आल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या नजरा याकडे लागल्या होत्या. अखेर राज्याच्या तंत्रशिक्षण मंडळाने त्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले. परिणामी, द्विभाषिक अभ्यासक्रम प्रक्रियेनुसार विद्यार्थ्यांना यापुढे मराठीतूनही उत्तरे लिहिण्याची संधी मिळणार आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका अगदी नर्सरीपासून ते उच्चशिक्षणाला बसला आहे. या संकटावर मात करण्याचा धोरणात्मक निर्णय घेताना राज्य सरकारला वारंवार टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पात्रतेत कोणते बदल होणार, याकडे शिक्षणक्षेत्रातील सर्वच घटकांचे लक्ष लागले होते. याबाबत राज्य तंत्रशिक्षण मंडळाने राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांकडे परिपत्रक जारी केले. त्यानुसार, प्रथम वर्षातील प्रवेशित मराठी-इंग्रजी माध्यमातून अध्यापनासाठी इच्छुक संस्थांकडून अभ्यासक्रमनिहाय पर्याय घेऊन अध्यापन प्रक्रिया द्विभाषिक राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन परिपत्रक धडकताच राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांनी संलग्नीकरणासाठी धावपळ सुरू केली आहे.
संस्थाच तयार करतील शिक्षण सामग्री
अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळाने मराठीत तयार केलेल्या सैद्धांतिक विषयांच्या शिक्षण सामग्रीचा वापर अभ्यासकांनी शिकविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी करावा. प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील प्रमुख सैद्धांतिक विषयांची शिक्षण सामग्री तंत्रशिक्षण मंडळ तयार करत आहे. मात्र, इतर अभ्यासक्रमांची शैक्षणिक सामग्री शिक्षण संस्थांना करावा लागणार आहे, असे या परिपत्रकात नमूद आहे.
असा असेल अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रम व प्रश्नपत्रिका इंग्रजीत राहील. मात्र, सैद्धांतिक परिक्षांमध्ये मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) उत्तरे लिहिण्याची मुभा आहे. ऑनलाईन परीक्षा इंग्रजीत होईल. प्रथम वर्षासाठी मराठी- इंग्रजी (द्विभाषिक) ऐच्छिक स्वरूपाचा अभ्यासक्रम असेल शिवाय विद्यार्थ्यांचे इंग्रजी संवादकौशल्य वाढविण्यासाठी इंग्रजी शिकवणी व प्रात्यक्षिक संस्था स्तरावर होईल. या पद्धतीमुळे द्वितीय व तृतीय वर्षांत इंग्रजीतून शिक्षण घेताना अडचणी येणार नाहीत, असा दावा तंत्रशिक्षण मंडळाने केला आहे.
तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नीकरणाची माहिती भरताना संस्थांनी अभियांत्रिकी पदविका अभ्याक्रमनिहाय किंवा मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापन पूर्ण करण्याच्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा. ज्या संस्थांना दोन्हीचा पर्याय निवडायचा आहे. त्यांनी त्याबाबत मंडळाला हमीपत्र दिले तरच संलग्नीकरणाची कार्यवाही पूर्ण होईल.
-डॉ. विनोद रोहितकर, संचालक, राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंंबई