अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
By राजेश शेगोकार | Updated: December 19, 2025 23:06 IST2025-12-19T23:04:59+5:302025-12-19T23:06:34+5:30
धमकीमुळे घर सोडून पळावे लागल्याचा दावा

अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
ब्रम्हपुरी (चंद्रपूर): ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध सावकारीविरोधातील कारवाईला वेग येत असतानाच आणखी एका पीडिताने पुढे येत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजकुमार दादाजी बावणे (वय ३२, व्यवसाय – मजुरी, रा. सोनेगाव) असे पीडिताचे नाव आहे. राजकुमार यांनी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरोधात अवैध सावकारी, धमकी तसेच आर्थिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सन २०२२–२३ दरम्यान राजकुमार बावणे हे सिटीग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत होते. त्या काळात कंपनीतील काही लोक शेतकऱ्यांची फसवणूक करून पसार झाले. ओळखीपोटी शेतकऱ्यांनी गुंतवलेले पैसे मागितल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या बावणे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये लक्ष्मण उरकुडे याच्याकडून ४ लाख रुपये १२ टक्के व्याजाने घेतले.दरमहा ४८ हजार रुपये व्याज रोख स्वरूपात दिल्यानंतरही उरकुडे याने अवाजवी व्याज, दिवसागणिक दंड व शिवीगाळ सुरू केली. कर्ज फेडण्यासाठी बावणे यांनी मुथूट मनी, सोनारांकडे दागिने गहाण ठेवून तसेच नातेवाईकांकडून पैसे उचलून एकूण ३१ लाख ४२ हजार ६०० रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तरीही उरकुडे याने ४० लाख रुपयांची खोटी थकबाकी दाखवून डिसेंबर २०२५ पर्यंत पैसे न दिल्यास कुटुंबासह ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सततच्या धमक्यांना वैतागून सोडले होते घर
या सततच्या धमक्यांमुळे जीवाच्या भीतीने राजकुमार बावणे हे ७ डिसेंबर २०२५ रोजी घर सोडून निघून गेले होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रारही पोलिसांत दाखल झाली होती. १६ डिसेंबर रोजी अवैध सावकारी कायद्यान्वये उरकुडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर बावणे यांनी आपणही या गुन्ह्याचे बळी असल्याचे सांगत तोंडी रिपोर्ट दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.