सळाखीत अडकलेल्या गर्भार कुत्रीच्या सुटकेसाठी धावला देवदूत
By Admin | Updated: April 21, 2015 00:58 IST2015-04-21T00:58:11+5:302015-04-21T00:58:11+5:30
तब्बल १२ तासांपासून ती जीवाच्या आकांताने विव्हळत होती. सळाखीत मान फसल्याने आणि फटीतून धड बाहेरही पडता येत

सळाखीत अडकलेल्या गर्भार कुत्रीच्या सुटकेसाठी धावला देवदूत
मृत्यूशी १२ तासांचा संघर्ष : तासभराचे जीवघेणे रेस्क्यू
गोपालकृष्ण मांडवकर ल्ल चंद्रपूर
तब्बल १२ तासांपासून ती जीवाच्या आकांताने विव्हळत होती. सळाखीत मान फसल्याने आणि फटीतून धड बाहेरही पडता येत नसल्याने पोटातील गर्भात चार-पाच पिल्लांचा पिंड घेऊन केविलवाणे ओरडत होती. अख्खा दिवस तापलेल्या उन्हात सुरू असलेली ही धडपड मरणपंथाला पोहचली, तरीही कुणी दयावान मदतीला धावला नाही. अखेर वन्यजीव आणि प्राणीमात्रांची कणव बाळगणारे प्रकाश कामडे धावले आणि जीवावर बेतून तासभर केलेल्या रेस्क्यू आॅपरेशननंतर तिची सहीसलामत सुटका केली.
हा प्रसंग आहे चंद्रपुरातील रामनगर परिसरातील शेंडे प्लॉट नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका सुखवस्तु फ्लॅटलगतचा. या फ्लॅटच्या बांधकामाच्या वेळी संबंधित कंत्राटदाराने पायव्यापासून भिंत उभारताना फट तशीच ठेवून दिली. या फटीतून डोकावणाऱ्या सळाखीही तशाच बेवारसपणे सोडून दिल्या. आरामदायक फ्लॅटमध्ये माणसं राहायला आली आणि पायव्याच्या फटीचा आसरा बेवारस कुत्र्यांनी शोधला. अशातच एका गर्भार बेवारस कुत्रीने पिलांना जन्म देण्यासाठी हा ‘सुरक्षित’ आडोसा शोधला असावा. प्रवेश करताना ती आत पोहचली, मात्र बाहेर निघताना तिची मान पाण्याच्या पाईपखाली अडकली. रविवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास अडकल्यापासून तिने सुटकेसाठी बराच प्रयत्न केला. मात्र ती पुन्हा पुन्हा अडकत गेली. तिचे विव्हळणे एकून फ्लॅटमधील आणि परिसरातील नागरिकही कुतूहलाने गोळा झाले. कुणी महानगर पालिकेला फोन केला. वनविभागातही फोन केला. तर कुणी दुरूनच गंमत पाहिली. पण मदतीला कुणीच धावले नाही. कुत्री एवढी फसली होती, की सर्वांनी तिची जगण्याची आशा सोडली. रात्री ९.३० वाजेपर्यंत ती अन्नपाण्यावाचून तशीच तळमळत होती.
अशातच या परिसरात राहणारे वरिष्ठ भूवैज्ञानिक गजानन कामडे यांनी वन्यजीव आणि पक्षीमित्र असलेले त्यांचे लहान भाऊ प्रकाश कामडे यांना मोबाईलवरून माहिती दिली. ते वडगाव परिसरात राहतात. ही माहिती मिळताच त्यांना राहवले नाही. आपल्या १३ वर्षांच्या नकूल या मुलाला आणि २३ वर्षाचा पुतण्या सूरज यांना सोबत घेऊन कुदळ, फावडे, घमेला, टॉर्च घेऊन ते रात्री ९.३० वाजता दुचाकीने पोहचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी बाजुच्या दुकानातून बिस्कीटे विकत घेतली आणि कुत्रीला चारली. पाणीही पाजले. ती फसली होती तिथे अंधार असल्याने टॉर्चच्या प्रकाशात काम सुरू केले. बराच प्रयत्न करूनही तिला बाहेर काढता येईना. दिवसभराच्या त्रासामुळे ती हिंसक झाली होती, त्यामुळे हातही लावता येईना. बचावासाठी टाकलेल्या काठी, कुदळीलाही ती चावा घेत होती. अखेर त्यांनी हिंमत बांधून आधी सभोवताची जमीन खोदली. खड्डा वाढवत तो कुत्रीपर्यंत पोहचविला. एकदाची खोल जागा तयार होताच तिची मान आणि पोट सळाखीतून सैल झाले आणि एकदाची तिची सुटका झाली. दिवसभराच्या मरणप्राय वेदनातून सुटका होताच ती हळूहळ बाहेर निघाली आणि दूर पळाली.
कसलेही प्रशिक्षण नसताना केवळ स्वत:च्या हिंमतीवर कुत्रीचे प्राण वाचविणाऱ्या प्रकाश कामडे यांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकाचा ठरला आहे.