लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: डॉ. शीतल करजगी आमटे यांच्या पार्थिवावर आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. यावेळी संपूर्ण आमटे परिवार येथे उपस्थित होता. आनंदवन, वरोरा व चंद्रपुरातील शेकडो नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आज सकाळी डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याने त्यांचे निधन झाले होते.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे पती आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डॉ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डॉ. शीतल या घरात पडून होत्या. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डॉ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना वरोरा शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता.
Web Title: In Anandvan, Burial of Sheetal Amte
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.