Ammunition seized from 4 ambulances | १०८ रुग्णवाहिकेतून दारुसाठा जप्त

१०८ रुग्णवाहिकेतून दारुसाठा जप्त

ठळक मुद्देवाहनचालकाला अटक : रामनगर पोलिसांची कारवाई, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णांना तत्काळ सोईच्या ठिकाणी भरती करता यावे, यासाठी शासनातर्फे सुरु केलेले रुग्णवाहिकेतून दारुचा पुरवठा होत असल्याची खळबळजनक बाब शनिवारी मध्यरात्री रामनगर पोलिसांनी बायपास रोडवर केलेल्या कारवाईत उघड झाली. या कारवाईत राहुल वानखेडे याला अटक करण्यात आली असून वाहनासह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एमएच १४ सीएल ०८९१ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांऐवजी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी सापळा रचून बायपास रोडवर नाकाबंदी केली. यावेळी येणाऱ्या रुग्णवाहिकेला थांबवून तपासणी केली असता, वाहनामध्ये देशी दारुच्या ४७ पेट्या, नंबर वनच्या आठ पेट्या, ओसी ब्ल्यूच्या १० पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी रुग्णवाहिकेसह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर व रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, एएसआय माऊलीकर, हवालदार गजानन डोईफोडे, रजनीकांत पुठ्ठावार, माजीद पठाण, रुपेश पराते, राकेश निमगडे, शंकर यांच्यासह रामनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली.

जुनोना येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाबुपेठ येथील जुनोना चौकात उडानपुलाच्या खाली सापळा रचून चारचाकी वाहनातून दोन लाख ५० हजार रुपये किंमतीच्या २६ पेट्या देशी दारु जप्त केली. याप्रकरणी एकाला महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअन्वये अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक म्हणून सागर धोमकर रुजू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे विविध कारवाई करण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, विनोद भोयर, चेतन अवचट, संदीप राठोड, अमोल भोयर, प्रशांत घोडमारे आदींनी केली.

Web Title: Ammunition seized from 4 ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.