आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
By Admin | Updated: February 5, 2016 00:49 IST2016-02-05T00:49:21+5:302016-02-05T00:49:21+5:30
हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,...

आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
चंद्रपूर : हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
रोहित वेमुला याच्यावर एबीव्हीपी संघटनेने खोटे-नाटे आरोप करून त्याला नक्षलवादी संबोधले. त्यावरून आमदार रामचंद्रराव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी कुलगुरू पी. आप्पाराव यांना रोहित वेमुला आणि त्याच्या चार मित्रांना विद्यापीठातून निलंबित केले. होस्टेलमधून काढले. त्यांना ग्रंथालय आणि मेसमध्ये येण्याची बंदी घातली तसेच त्याचे सात महिन्याचे विद्यावेतनही रोखले. त्यानंतर रोहित वेमुला याने होस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली, असे सांगण्यात येते. पण त्याचा मृत्यू संशयास्पद आहे. तसेच मुदुराई जिल्ह्यातील एका दलिताचे शव अंतिम संस्कारासाठी मुख्य रस्त्याने नेण्यास मनाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा स्थानिक प्रशासन व सरकारने काहीच कारवाई केली नाही आणि शेवटी पोलिसांनी त्याचे बळजबरीने जंगलात अज्ञात ठिकाणी दफन केले. हा २१ व्या शतकातील जातीवादाचा घृणास्पद प्रकार आहे.
या दोन्ही अमानवी घटनांचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी १.३० वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ वाजता धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन दिले. त्यात बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे, या दोन मंत्र्यांसह आमदार एन. रामचंद्रराव, कुलगुरू पी. आप्पाराव आणि एबीव्हीपीचा नेता नंदनम सुशिलकुमार यांना अॅट्रासिटी अॅक्ट व सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी. रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई व कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. दलित प्राध्यापकांचे राजीनामे स्वीकारू नयेत. रोहितच्या मित्रावरील केसेस मागे घेऊन त्यांचे विद्यावेतन त्वरित द्यावे. तसेच मदुराई जिल्हा प्रशासनातील पोलीस आणि रेव्हेन्युच्या अधिकाऱ्यांवर अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. या मागण्यात करण्यात आल्या. या शिष्टमंडळात प्रविण खोबरागडे, प्रा. एस.टी. चिकटे, अशोक निमगडे, अॅड. राकेश रंगारी, प्रतिक डोर्लीकर, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले, सविता कांबळे, राजू भगत, अल्का मोटघरे, सिद्धार्थ वाघमारे, शालिनी भगत, जयप्रकाश कांबळे, सत्यजित खोबरागडे, विशाल अलोणे, रवी मून, गोपी मित्रा आदींचा समावेश होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अतिशय शांततेने निघालेल्या मोर्चात महिला आणि युवकांची संख्या मोठी होती. मोर्चातील लोक ‘वेमुला अमर रहे’, ‘बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना बरखास्त करा’, ‘रोहित वेमुलाच्या हत्याऱ्यांना अटक करा’ अशा घोषणा देत होते.
या मोर्चात भंते कृपाशरण महाथेरो, भंत विनयबोधी, भंते अनिरूद्ध, प्रविण खोबरागडे, खुशाल तेलंग, किशोर पोतनवार, द्रोपदीबाई काटकर, अॅड. शेंडे, अॅड. उराडे, वामन सरदार, भिमलाल साव, रमेशचंद्र राऊत, तथागत पेटकर, कोमल खोब्रागडे, राजू खोबरागडे, राजेश वनकर, रवी मून, रामजी जुनघरे, हिराचंद बोरकुटे, ज्योती रंगारी, बेबीताई उईके, इंदूमती पाटील, यशोधरा पोतनवार, शंकर सागोरे, कुशाल मेश्राम, सुरेश नारनवरे, राजू किर्तक, विलास बनकर, विद्याधर लाडे, भाऊराव दुर्योधन, सुरज कदम, अॅड. लोहकरे, राजकुमार जवादे, सिद्धार्थ वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते होते. जिल्हा कचेरीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. (शहर प्रतिनिधी)