महानिर्मितीविरुद्ध आमरण उपोषण सुरू
By Admin | Updated: September 10, 2014 23:34 IST2014-09-10T23:34:14+5:302014-09-10T23:34:14+5:30
महानिर्मितीच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लोखंड चोरी आणि कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे,

महानिर्मितीविरुद्ध आमरण उपोषण सुरू
चंद्रपूर : महानिर्मितीच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लोखंड चोरी आणि कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश प्रतिनिधी सुनिल दहेगावकर यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
चार महिन्यांपूर्वी लोखंड चोरी प्रकरणात पोलिसांनी तिरुपती कन्स्ट्रक्शनविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतरही चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. याआधी पाईप चोरी प्रकरणात भावना कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर वीज केंद्राने या कंपनीला काळ्यात यादीत टाकण्याची कारवाई केली होती. कोळसा वाहतुकीमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी कुक्कू साहनी यांच्या कंपनीलासुद्धा काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र तिरुपती कन्स्ट्रक्शनविरुद्ध वीज केंद्राने अशी कोणतीही कारवाई केली नाही. यामागे तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनी आणि वीज केंद्र प्रशासनाचे हितसंबंध जुळले असल्याचा आरोप दहेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण ताजे असतानाच एका कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी तिरुपती कन्स्ट्रक्शनने खोटे दस्ताऐवज सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतरही वीज केंद्राने प्रशासकीय कारवाई करण्याचे टाळले.दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरुपाची असताना महानिर्मिती आणि चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाने तिरुपती कन्स्ट्रक्शनला लाखो रुपये किमतीचे दुसरे कंत्राट दिले. लोखंड चोरी आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकून सुरू असलेली कामे तत्काळ बंद करण्यात यावी, यासाठी दहेगावकर यांनी महानिर्मिती आणि वीज केंद्र प्रशासनाला आठवभराचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आठवडाभरात कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवारपासून दहेगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव झाडे, राकाँच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. हिराचंद बोरकुटे, गजानन पाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, रायुकाँचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वडूळकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण भगत, प्रदीप रत्नपारखी, महेंद्र मेश्राम, रवी भोयर, विशाल चहारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)