मलेरियासदृश तापाची कोठारीत साथ
By Admin | Updated: September 6, 2014 01:45 IST2014-09-06T01:45:01+5:302014-09-06T01:45:01+5:30
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात मलेरियासदृश तापाची साथ पसरली आहे.

मलेरियासदृश तापाची कोठारीत साथ
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरात मलेरियासदृश तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकात प्रचंड भीती निर्माण झाली असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मागील १५ दिवसांपासून कोठारी, कवडजई, पळसगाव, आमडी, काटवली, बामणी आदी गावांमध्ये तापाची साथ सुरु आहे. कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी होत आहे. दवाखान्यात प्रभारी डॉक्टर सध्या कार्यरत असून महिला डॉक्टर उपस्थित नाही. परिणामी एका डॉक्टरच्या भरवशावर १५ ते २० हजार लोकांच्या आरोग्याचा भार आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येने डॉक्टरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दवाखान्यात महिला डॉक्टर मागील एक वर्षांपासून उपस्थित नसल्याने महिला रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येण्यापासून कचरत आहेत. गावातील खाजगी डॉक्टरांकडे रुग्णांची झुंबड उडत आहे.
खाजगी दवाखाने सध्या हाऊसफुल्ल आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने नागरीक कोठारी, बल्लारपूर व चंद्रपूर येथे उपचारासाठी धाव घेत आहेत. राजुरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल आदी तालुक्यातही डेंग्यू आजाराचे थैमान आहे. (वार्ताहर)