शासकीय रस्ता तलाठ्याने विकल्याचा आरोप
By Admin | Updated: July 7, 2014 23:29 IST2014-07-07T23:29:16+5:302014-07-07T23:29:16+5:30
शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे. बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण

शासकीय रस्ता तलाठ्याने विकल्याचा आरोप
गावकऱ्यांची तक्रार : विरोध करणाऱ्यांना दिली धमकी
राजुरा : शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे.
बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण संस्था असून २५ ते ३० प्लॉटधारक व इतर २० ते ३० कुटुंब वास्तव्य करीत आहेत. गृहनिर्माण संस्थेचा मंजुर ले-आऊट असून त्यामध्ये एकंदर ३२ प्लॉट आहेत. प्लॉट क्रमांक सात हा राजुरा- चुनाळा मुख्य रस्त्याला लागून असून पश्चिमेला दसवारु नाल्याच्या किनाऱ्याला लागून २० ते २५ फूट सार्वजनिक सरकारी रस्ता आहे. त्या पलिकडे दसवारु नाला आहे. वास्तविक सात क्रमांका प्लॉट हा ४३२ चौरस मिटर आहे. परंतु गैरअर्जदाराने त्यांच्याकडून प्लॉट खरेदी केलेला आहे. ते तलाठी असल्यामुळे प्लॉटचे बनावट दस्तावेज तयार करुन जास्तीची जागा दाखिविली आहे. प्रत्यक्षात गैरअर्जदाराने दसवारु नाल्याकडून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करुन स्वत: सिमांकन दर्शविणारा दगड गाडलेला आहे. संपूर्ण प्लॉटधारकांची वहीवाट तसेच रस्ता नाल्ययाला लागून सरकारी जमिनीतून आहे. सदर वहीवाट २५ ते ३० वर्षापासून आहे. तलाठ्याने आपल्या बळाचा व पदाचा गैरवापर करुन सरकारी जमिनीवरील वहीवाट असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.
ग्रामस्थाने समजविण्याचा प्रयत्न केला असता, विक्री करुन देणाऱ्या तलाठ्याने आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही, इथून कसे रस्त्याने जाता ते बघून घेवून, अशी धमकी देवून, दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सन २००८ मध्ये तलाठ्याने प्लॉट क्रं. सातसह सरकारी जागेवरील वहीवाट असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करुन घर बांधकाम सुरु केलेले होते. परंतु बामणवाडा ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंचांनी एका पत्राद्वारे सदर घराचे बांधकाम बंद करण्यास सूचविले होते व प्लॉट क्र. सातचे दस्तऐवज मूळ नकाशासह बामणवाडा ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे सूचविण्यात आले. परंतु तलाठी यांनी घराचे सदर घराचे बांधकाम बंद करुन परस्पर प्लॉट क्रमांक सातची विक्री करुन दिली. त्यांनाही सरकारी रस्त्यावर आपली जागा असल्याचे भासवून खोटे दस्ताऐवज तयार करण्यात आले आणि प्लॉट क्रमांक सातचा पुरावा बामणवाडा ग्रामपंचायतीला सादर केलेला नाही.
१४ जुलै २००८ ला झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील विषय क्रं. सातमधील ठराव क्रं. ७/२ अन्वये चार मीटर बाय १५० मिटर लांबीचा रस्ता सामान्य सेस फंडाच्या रकमेतून पूर्ण करण्यासाठी मासिक सभेची मंजुरी प्रदान केलेली आहे. परंतु सदरहू प्लॉटधारक रस्त्यावर अतिक्रमण करुन वहीवाट असलेला रस्ता बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे.
त्यामुळे त्वरीत कार्यवाही करुन सरकारी जमिनीवरील वहीवाट असणाऱ्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण संस्था बिरसामुंडानगर येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा नाईलाजास्त तीन दिवसात सर्व सभासद व बिरसामुंडा नगरवासिय आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या वॉर्डातील रहिवाशांनी दिला आहे.
निवेदनावर मधुकर कोटनाके, शामराव चंदनखेडे, डॉ. बुऱ्हान, तिवारी, रामभाऊ देवईकर, संतोष हुसूकले, पृथ्वीराज कटेरे, रिंकु मरस्कोल्हे, लक्ष्मण कुमरे, एस.ए. चिडे, मडावी, सुधाकर बुऱ्हाण, देवानंद राजीकर, आत्माराम खेडेकर यांच्यासह परिसरातील ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर प्रतिनिधी)