एसबीआयचे तिन्ही अधिकारी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:00:44+5:30
आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ कर्जदार अन् एका एजंटने जामिनासाठी अर्ज केला असून, यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील फरार चार अधिकाऱ्यांच्या शोधार्थ मुंबई व नागपूरला गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले आहेत. तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गृहकर्जात १४ कोटी २६ लाखांची बँकेची फसवणूक केली आहे.

एसबीआयचे तिन्ही अधिकारी न्यायालयीन कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) १४ कोटी २६ लाख रुपयांच्या गृहकर्ज फसवणूक प्रकरणी अटकेतील बँकेच्या तीनही अधिकाऱ्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. पोलीस कोठडी संपल्याने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ कर्जदार अन् एका एजंटने जामिनासाठी अर्ज केला असून, यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील फरार चार अधिकाऱ्यांच्या शोधार्थ मुंबई व नागपूरला गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले आहेत.
तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गृहकर्जात १४ कोटी २६ लाखांची बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली.
दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडिट व्यवस्थापक देवीदास कुळकर्णी या तिघांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.
कागदपत्रांची पडताळणी सुरू
अधिक गृहकर्ज मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकेचे अधिकारी व एजंटसह हातमिळवणी करून बनावट आयकर कागदपत्रे सादर करून भारतीय स्टेट बँकेला १४ कोटी २६ लाखांनी गंडविले. साधारणत: ४४ कर्जदारांच्या प्रकरणात बनावट आयकर कागदपत्रे असल्याची तक्रार क्षेत्रीय व्यवस्थापकांनी केली होती. त्या आधारावर कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
बिल्डर्स लाॅबी हादरली
एखाद्या ग्राहकाला फ्लॅट विकण्यासाठी जादाचे कर्ज मिळवून देण्यासाठी बिल्डरांच्या माध्यमातून बँकेच्या अधिकाऱ्यांशी साठगाठ झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यास चंद्रपुरातील नामांकित बिल्डर्स यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. हा गृहकर्ज घोटाळा उघडकीस येताच बिल्डर्स लाॅबी हादरल्याचे दिसून येते.