रुग्णाच्या संपर्कातील पाचही अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:05+5:30
बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे बुधवारी घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेटजवळ चंद्रपूर येथील एक युवती संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदर रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे.

रुग्णाच्या संपर्कातील पाचही अहवाल निगेटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १३ मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यातील अती जोखमीच्या पाच नातेवाईकांपैकी पाचही जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सध्या नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे बुधवारी घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेटजवळ चंद्रपूर येथील एक युवती संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदर रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. १३ मे रोजी या व्यक्तीच्या संपर्कातील पाच रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या पाच लोकांचे प्रतीक्षेत असणारे स्वॅब नमुने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
बिनबा गेट परिसरातील नव्या रुग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी पाच लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. बिनबा गेट परिसरातील रूग्णदेखील चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असून तिची प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील एकूण १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी एकूण ७२८ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व माहिती घेण्यात येत आहे.
तर २ मे रोजी आढळलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आतापर्यंत घेण्यात आलेल्या ५५ नागरिकांच्या नमुन्यांपैकी ५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. दोन नमुने प्रतीक्षेत आहे. या परिसरातील दोन हजार १५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आठ हजार ५४० नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी २ मेपासून सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा संशयित रुग्ण या परिसरात आढळलेला नाही.
संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-१९ ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ३०० आहे.
यापैकी दोन नागरिक पॉझिटीव्ह निघाले असून २७२ नागरिक निगेटीव्ह आहे. २६ नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
लॉकडाऊननंतरही काही दुकाने उघडीच
चंद्रपुरात दुसरा कोरोना रुग्ण मिळाल्यानंतर प्रशासनाने गुरुवारपासून लॉकडाऊनमधील शिथिलता थांबवून केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र गुरुवारी जीवनावश्यक वस्तूंसह अनेक दुकाने अर्थवट शटर उघडून सुरू करण्यात आली होती. अर्धवट उघडलेल्या या दुकानांमध्ये ग्राहकही येताना दिसून येत होते.