वाघाच्या दहशतीने सोडली शेतीची जागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 22:35 IST2018-10-09T22:34:50+5:302018-10-09T22:35:40+5:30
चुनाळा येथील शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

वाघाच्या दहशतीने सोडली शेतीची जागली
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : चुनाळा येथील शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
चुनाळा परिसरातील चुनाळा, चनाख, सास्ती परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरात गुराखी व काही नागरिकांनी वाघाला बघितले. याच परिसरात अनेक ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसत असल्याने शेतीची जागली कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाºयांना माहिती देण्यात आली. परंतु, संबंधित अधिकारी दुर्लक्ष करित असल्याचा आरोप नागरिकांनी केला. चुनाळा परिसरात मागील दहा दिवसांपासून बऱ्याच शेतकरी शेताची राखण करणे सोडून दिले. चुनाळा जंगलात संचार करणाऱ्या वाघाला पिंजऱ्यांत बंद करून व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये सोडण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी उपविभागीय मध्यचांदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.