महिलांच्या संघर्षानंतर उद्ध्वस्त कुटुंबे सावरु लागली
By Admin | Updated: December 1, 2014 22:51 IST2014-12-01T22:51:35+5:302014-12-01T22:51:35+5:30
ज्या गावात ‘देशी नाही असा गाव देशात नाही’ असे म्हटले जात असले तरी मोहाळी हे गाव याला अपवाद आहे. येथील महिलांच्या मोठ्या संघर्षानंतर गावात पूर्णत: दारुबंदी झाली.

महिलांच्या संघर्षानंतर उद्ध्वस्त कुटुंबे सावरु लागली
मोहाळी (नलेश्वर) : ज्या गावात ‘देशी नाही असा गाव देशात नाही’ असे म्हटले जात असले तरी मोहाळी हे गाव याला अपवाद आहे. येथील महिलांच्या मोठ्या संघर्षानंतर गावात पूर्णत: दारुबंदी झाली. दारुमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे आता हळूहळू सावरु लागली आहेत. यात महिलांचा संघर्ष त्याला तंटामुक्त गाव समितीचे सहकार्य, यातून हा चमत्कार घडत आहे.
मिसरुड न फुटलेल्या तरुणांना दारुचे व्यसन जडल्याने मद्यपींची संख्या वाढली होती. समाजासाठी हे घातक ठरले तरी इतर कुठलीच तमा न बाळगता मद्यपी मदमस्त जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच आर्थिक चणचण व मानसिक तणावामुळे गावातील शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने आता ही कुटुंबे सावरु लागली आहेत.
मोहाळी येथे मागील दीड वर्षांपूर्वी नव्याने तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामजिक जाणिवेचा कार्यकर्ता तेजराज नन्नावरे याची निवड करण्यात आली. गावातील महिलांनी या तरुणाकडे धाव घेऊन गावात दारुबंदी करण्याची मागणी केली. गावात या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. आणि विलक्षण बदल जाणवला. लोकांनी मद्यप्राशन करणे सोडले नसले तरी प्रमाण मात्र फार कमी झाले. दारूच्या अवैध व्यवसायावर लाखो रुपयांची होणारी वार्षिक उलाढाल ठप्प पडली. कुटुंबातील व्यक्ती कामात गुंतली आणि दारूमुळे उद्ध्वस्त कुटुंबही पुन्हा उभे राहू लागले असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या मोहाळी गावात दिसून येत आहे. मोहाळी या गावात दीड वर्षांपूर्वी येथील अनेक तरुणापासून तर वृद्धापर्यंत सर्वच स्तरातील लोकांची गावातील अवैध दारू व्यावसायिकांकडे रीघ लागायची. आनंदाची वेळ असो वा दु:खाचा प्रसंग, होळी असो वा पोळा दारू पिण्यासाठी त्यांना केवळ निमित्त हवे असायचे.
दारूची वाढती मागणी लक्षात घेता दारू व्यवसायात स्पर्धा रंगू लागली. यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल सुरू होती. शासनाच्या निर्देशानुसार गावात दीड वर्षांपूर्वी नव्याने तंटामुक्त गाव समिती गठीत झाली. त्यानंतर गावातील दारुबंदीचा विषय ग्रामसभेत मोठ्या चवीने चर्चील्या गेला. अतीमद्यप्राशनाने प्रकृतीत बिघाड, कुटुंबकलह व आर्थिक चणचण अशा एक ना अनेक समस्या उद्भवत असल्याने यातून भांडणे तंटे निर्माण होत असे. ही बाब सुज्ञ गावकऱ्यांच्या मनाला लागली. सुमारे ५० वर्षांपासून सुरु असलेल्या अवैध दारुचा व्यवसाय बंद करणे येथील तंटामुक्त गाव समितीला सहज व सोपे नव्हते. दरम्यान गावातील एका सशक्त महिला समुहाने मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले.महिलांनी सतत दारूविक्रीच्या विरोधातील व्यापक मोहिम राबविताना त्यांना कुटुंबाची नाराजी ओढावून आर्थिक संकटाचा सामना करीत दररोजच शिव्यांचा मारा सहन करावा लागला.
याही परिस्थितीत अवैध दारु विक्रीचा प्रकार सुरूच होता. सायंकाळ होताच व्यसनी लोक दारू विक्रेत्यांकडे धाव घेत असत. ही बाब हेरून तंटामुक्त समितीच्या सदस्य असलेल्या महिला समूहाने धाडसत्र राबविले. दारू प्राशन व विक्री करताना कित्येकांना रंगेहाथ पकडून तंटामुक्त समितीच्या स्वाधीन केले. दरम्यान, महिलांनी रात्रं जागून काढल्या. दारू प्राशनानंतर मुलाच्या बेताल वागण्यामुळे कुटुंबाला अनेकदा प्रचंड त्रास होत होता. भारताचे नवे आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीला दारूसारख्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकातील व्यक्तीकडून प्रबोधन करण्यात आले. आज दीड वर्षांच्या संघर्षानंतर दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे आता सावरु लागली आहेत. दारूबंदीमुळे गावात शांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. (वार्ताहर)