स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या जीवनात अंधार
By Admin | Updated: May 23, 2015 01:31 IST2015-05-23T01:31:59+5:302015-05-23T01:31:59+5:30
आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.

स्वातंत्र्यानंतरही आदिवासींच्या जीवनात अंधार
जिवती: आदिवासी बांधवाचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. प्रत्यक्ष त्या योजनेचा फायदा कितपत त्या आदिवासी बांधवाना होतो, याचा प्रत्यय आता पहाडावरील आदिवासी गाव-गुडे पाहिल्यानंतर येतो.
जीवती तालुक्यातील १२ घरांची वस्ती असलेल्या जीवती तालुक्यातील लखमापूर (येरवा) या आदिवासी गुड्ड्याला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता, तेथील भयाण वास्तव्य समोर आले. वीज, आरोग्य, रस्ते, पाण्याबरोबरच विजेचा प्रकाशही गावात पोहोचला नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही या आदिवासी बांधवाना अंधारात जीवन जगावे लागत आहे.
डोंगराच्या कुशीत असलेल्या लखमापूर (येरवा) गावात १२ घरांची वस्ती आहे. ७० च्या जवळपास येथील लोकसंख्या असून प्रत्येक गावगुड्यातील नागरिकांना सोयी- सुविधा मिळणे आवश्यक असताना बंधनकारक असली तरी लखमापूर (येरवा) विविध विविध कायमच्या चिटकून बसल्या आहेत. गावात जायला योग्य रस्ता नाही. महामंडळाची बस गावात जात नाही, दूरध्वनी सेवाही नाममात्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तर गावकऱ्यांचे हाल होत आहेत. आरोग्याची काळजी घेणारे कर्मचारी कर्तव्यापुरते गावात येतात. गाव विकासाची महत्वाची धुरा सांभाळणारा ग्रामसेवकही गावात येत नसल्याचे गावकरी सांगतात. गृहकर वसुलीसाठी चपऱ्याशाला गावात पाठविले जात असल्याची माहितीही येथील नागरिकांनी दिली.
आदिवासी बांधवाना विजेची सोय व्हावी, यासाठी गावकरी व शाळकरी मुलांनी विद्युत विभाग कार्यालय, बल्लारपूर, जीवती, तसेच या क्षेत्राचे आमदार संजय धोटे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आलीत. मात्र त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. २०११ मध्ये गावात विजेचे खांब आले. तारही टाकण्यात आलेत.मात्र अद्यापही वीज जोडण्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्यात; पण संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे या आदिवासी बांधवाना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या घोषणा देत सभा गाजविणाऱ्या नेत्यांनी प्रत्यक्ष गावात जावून जनतेच्या समस्या जाणून समस्या सोडविण्याची मागणी आनंदराव कोटनाके चिन्नु, कोटनाके,रघुनाथ कोटनाके आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)