अखेर 'तो' बिबट्या जेरबंद! सिंदेवाही परिसरात होती दहशत, वनविभाग व एफडीसीएमला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:03 IST2017-12-27T17:03:25+5:302017-12-27T17:03:58+5:30
मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अखेर 'तो' बिबट्या जेरबंद! सिंदेवाही परिसरात होती दहशत, वनविभाग व एफडीसीएमला यश
सिंदेवाही (चंद्रपूर) : मागील काही दिवसांपासून सिंदेवाही परिसरात बिबट्याची दहशत होती. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र बिबट हाती लागत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. त्यामुळे वनविभाग व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोनवाही येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील परिसरात एक महिन्यांपासून बिबट कुत्र्यांवर हल्ला करून ठार मारत होता. या बिबट्याचे अनेक नागरिकांना रस्त्यावर दर्शन झाले होते. त्यामुळे पसिरातील नागरिक पहाटे व सायंकाळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते. परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. वनविभाग व एफडीसीएमच्या सहकार्याने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
बिबट्याला पकडण्यासाठी बाजार समितीच्या मागील परिसरात पिंजरा लावण्यात आला. त्यामध्ये पाळीव कुत्रा ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट हा कुत्र्यांच्या शिकारीसाठी आला असता पिंजºयात जेरबंद झाला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होवून जेरबंद बिबट्याला कुठे हलविणार याबद्दल निर्णय घेतील, असे क्षेत्रसहाय्यक पी. एम. करंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वाघाची दहशत कायम
सिंदेवाही येथील प्रभाग क्रमांक १४ मधील रहिवासी कमल केशव निकोडे यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना १० डिसेंबरला उघडकीस आली होती. कमल निकोडे या लगतच्या जंगलात झाडूच्या काळ्या जमा करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून या परिसरात आणखी दहशत पसरली होती. बुधवारी जेरबंद झालेला बिबट असल्याने वाघाची दहशत मात्र कायम आहे.