ग्रामोदय संघाद्वारे कारागिरांना उन्नत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:21+5:302021-01-13T05:13:21+5:30
भद्रावती : भद्रावती ग्रामोदय संघ व महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या निधीद्वारे ...

ग्रामोदय संघाद्वारे कारागिरांना उन्नत प्रशिक्षण
भद्रावती : भद्रावती
ग्रामोदय संघ व महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या निधीद्वारे ग्रामीण कुंभार कारागिरांना घरपोच कौशल उन्नत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यातील चार गावात राबविण्यात येत असून कारागिरांची मिळकत या माध्यमातून वाढणार आहे.
सदर उपक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत मिशनशी निगडीत आहे.
अहेरी तालुक्यातील बोरी, महागाव, पोचली पेठा
तर भामरागड तालुक्यातील येचली या चार गावांमध्ये दोन महिन्यांचे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध प्रकारच्या मातीच्या मूर्ती कला, टेराकोटा ,दागिने ,फ्लॉवर पाट, कुंडी, सजावटी वस्तू, घरगुती कुकिंग पॉट, स्वयंपाकाची भांडी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. अत्यंत दुर्गम, नक्षली व अतिसंवेदनशील भागात सदर प्रशिक्षण दिले जात आहे. अशा गावात ग्रामोदय संघाने आपले कार्य सुरू केले आहे.
प्रशिक्षणानंतर उपस्थित कारागिरांना एक सामान्य सुविधा केंद्र बांधून देणार आहेत. आवश्यक मशिनरी देण्यात येणार आहे. बारा महिने काम करू शकेल अशी सोय करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालासाठी बाजारपेठेची सोय मोफत करून देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाला ग्रामोदय संघ भद्रावतीचे प्राचार्य जितेंद्रकुमार, कांता मिश्रा, मुख्य समन्वयक सोपान कावळे, रोशन नैताम, व्यंकटेश, अंजली यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रशिक्षक म्हणून रमेश गाडेकर, सूर्यभान राऊत, अरुण कपाट, विक्की अटकापूरवार, रुपेश बोरसरे, प्रकाश बोरसे कार्यरत आहेत.