आदिवासी वस्तिगृहातील विद्यार्थी उपोषणावर
By Admin | Updated: August 14, 2014 23:38 IST2014-08-14T23:38:29+5:302014-08-14T23:38:29+5:30
आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या येथील आदिवासी विद्यार्थी वस्तिगृह क्रमांक दोनमध्ये निर्माण झालेल्या समस्यांना कंटाळून तेथे वास्तव्याला असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी गुरूवारी

आदिवासी वस्तिगृहातील विद्यार्थी उपोषणावर
अनागोंदी कारभार : वार्डनला हटविण्याची मागणी
चंद्रपूर : आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या येथील आदिवासी विद्यार्थी वस्तिगृह क्रमांक दोनमध्ये निर्माण झालेल्या समस्यांना कंटाळून तेथे वास्तव्याला असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी गुरूवारी उपोषणाचा मार्ग स्विकारला. दरम्यान, प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वस्तीगृहात जाऊन विद्यार्थ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत वॉर्डनची तेथून बदली केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली.
या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. अनेकदा मागणी करूनही वॉटरफिल्टरची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही. क्षारयुक्त पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत आहे. अनेकांना त्वचारोग झाला असून वसतीगृहातील विद्यार्थी वारंवार आजारी पडत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून येथे कार्यरत सफाई कामगार न आल्याने वस्तीगृहाला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वस्तीगृहातील पाण्याच्या टाक्यांवर झाकण नसल्याने त्या उघड्याच आहेत. तेच पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागते. वस्तीगृह परिसरात एक हातपंप आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो बंद आहे. वस्तीगृहातील काही पंखे बंद आहेत. ते दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले. मात्र अद्यापही दुरूस्त होऊन ते आले नाहीत. जेवणही निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंतही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. (प्रतिनिधी)