प्राचीन स्मारके स्वच्छतेसाठी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:18 IST2018-05-25T22:18:17+5:302018-05-25T22:18:33+5:30
राष्ट्रीय स्मारक आणि प्राचीन वास्तुंमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवून पर्यटनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ‘अडॉप्ट अ मॅन्युमेंट’ व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर येथील इको- प्रो स्वयंसेवी संस्थेसोबत गुरुवारी करार करण्यात आला़

प्राचीन स्मारके स्वच्छतेसाठी दत्तक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय स्मारक आणि प्राचीन वास्तुंमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवून पर्यटनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ‘अडॉप्ट अ मॅन्युमेंट’ व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर येथील इको- प्रो स्वयंसेवी संस्थेसोबत गुरुवारी करार करण्यात आला़
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांची केंद्रिय संरक्षित स्मारक व स्थळांवर स्वच्छता आणि मुलभूत पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘स्मारकाची दत्तक परियोजना’ हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील २१ केंद्रिय संरक्षित स्मारक, स्थळ आणि परिसरात स्वच्छ भारत अभियान राबविण्याच्या दृष्टीने २४ मे रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि चंद्रपूर येथील इको-प्रो बहुउद्देशिय संस्था यांच्यात करार झाला. करारानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके स्वच्छ भारत अभियान राबविण्यास इको-प्रो संस्थेस दत्तक देण्यात आलेले आहे.
नागपूर येथील पुरातत्व भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरातत्व विभागाच्या वतीने अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आय. ए. हाश्मी, इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
यावेळी मुंबईचे प्रादेशिक निदेशक डॉ़ एम़ नंबीराजन, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, इको-प्रो संवर्धन विभागाचे प्रमुख रवींद्र गुरनुले, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या सहायक पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. शिल्पा जामगडे, इको-प्रोचे नितीन बुरडकर, अनिल अद्गुरवार, हरीश मेश्राम, वैभव मडावी, अमोल मेश्राम, सिनेट सदस्य समीर केने, बल्लारपूरचे नगरसेवक विकास दुपारे, नगर अभियंता संजय घोडे यांची उपस्थिती होती़ दरम्यान, करार झाल्यानंतर इको-प्रोच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पर्यटनास मिळणार प्रोत्साहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश यशस्वी करण्याच्या उद्देशाने जगभरातील पर्यटकांना देशभरातील पर्यटन स्थळांकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने 'स्मारक दत्तक योजना' राबविण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, या संस्थेने यापूर्वीच किल्ला स्वच्छता अभियान राबविले होते़ मागील एक मार्च २०१७ पासून अविरतपणे ११ किमी लांबीच्या चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला स्वच्छ करण्याचे काम अखंडित सुरू आहे़ त्यास आज ४२९ दिवस पूर्ण झालीत़ त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात संस्थेच्या कार्याचा आणि चंद्रपूर शहराचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता़