रेल्वे उड्डाण पुलाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:53+5:302021-04-02T04:28:53+5:30

चंद्रपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चार ते पाच उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, ...

Administration neglects maintenance of railway flyover | रेल्वे उड्डाण पुलाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रेल्वे उड्डाण पुलाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चार ते पाच उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील वरोरा नाका चौकामध्ये असलेल्या उड्डाणपुलाच्या भितींवर तर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला भेगा गेल्या आहेत. मात्र, सदर झुडपे काढण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रस्ते लहान आणि वाहने जास्त अशी अवस्था मागील काही वर्षामध्ये सध्या बघायला मिळत आहे. जिथे-तिथे वाहतूक कोंडी होत आहे. यावर मार्ग काढत शहरात काही ठिकाणी उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे, वरोरा नाका चौकामध्ये आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशी अपघात झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

वरोरा नाका येथील जुन्या पुलाला नवा समतल पूल बांधून वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान, डाॅ. आंबेडकर काॅलेजकडे जाणारा पूल तयार असूनही त्याचे अद्याप उद्घाटन झाले नाही. त्यामुळे तुकूम परिसरातील नागरिकांना रामनगर परिसरात येण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलांची नियमित देखभाल करून पुलावरील माती उचलावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Administration neglects maintenance of railway flyover