जिल्ह्यातील शांततेसाठी प्रशासनाची बैठक

By Admin | Updated: August 3, 2014 00:01 IST2014-08-03T00:01:35+5:302014-08-03T00:01:35+5:30

होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि या दरम्यानच पोळा, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव व दसरा हे सण आल्याने जिल्हावासियांनी शांतता व सुव्यवस्था राखावी व एकतेचे दर्शन घडवावे,

Administration meeting for peace in the district | जिल्ह्यातील शांततेसाठी प्रशासनाची बैठक

जिल्ह्यातील शांततेसाठी प्रशासनाची बैठक

नागरिकांना आवाहन : शांतताप्रियतेची परंपरा कायम ठेवा
चंद्रपूर : होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि या दरम्यानच पोळा, गणेशोत्सव, दुर्गाउत्सव व दसरा हे सण आल्याने जिल्हावासियांनी शांतता व सुव्यवस्था राखावी व एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी संजय दैने व जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा शांतताप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. हिच परंपरा यावर्षीही कायम ठेवून जिल्हावासियांनी शांततेत उत्सव साजरे करावेत असे ते म्हणाले.
गणेश मिरवणूक वेळेत निघावी व वेळेत संपावी, शहरातील रस्त्याची डागडूजी गणेश उत्सवापूर्वी व्हावी, शहरात विखुरलेले केबल व विजेच्या तारा व्यवस्थित कराव्यात, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, मोकाट जनावरे व कुत्रे यांचा बंदोबस्त करावा, अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, एकाच तलावात विसर्जन होवू नये, मूल शहरातील मुख्य रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे व कुठल्याही अफवा पसरणार नाही याची दक्षता घ्यावी यासह अनेक सूचना जिल्ह्यातील शांतता समिती सदस्यांनी बैठकीत मांडल्या.
यावर उत्तर देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन म्हणाले शांतता समिती सदस्यांच्या सूचना प्रशासन व पोलीस विभागाकडून अंमलात आणल्या जातील. बाहेरुन येणाऱ्या फेरीवाल्यांची तपासणी पोलिसामार्फत केली जाणार आहे. उत्सवादरम्यान महिलांची छेड रोखण्यासाठी अतिरिक्त पथक निर्माण करण्यात येणार असून दारु विक्रीवर नियंत्रणासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने उपाययोजना केली जाईल.
फेसबुक, व्हॉटस्अप, व्टिटर यासारख्या सोशल मिडीयावर नागरिकांनी कुठल्याही समाजाच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत असे फोटो, व्हिडीओ व पोस्ट करु नयेत. सोशल मिडीयाचे मॉनिटरिंग केले जात असल्याचे राजीव जैन यांनी यावेळी बैठकीत सांगितले. बैठकीचे संचालन संजय जाधव यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Administration meeting for peace in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.