जिल्ह्यात केवळ २६ नव्या बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:07+5:302021-01-02T04:24:07+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर २६ कोरोनाबाधित रुग्णांची ...

जिल्ह्यात केवळ २६ नव्या बाधितांची भर
चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर २६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ३३४ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ५४९ झाली आहे. सध्या ४१८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७६ हजार २३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ४९ हजार ९८८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या झरी जामणी शहरातील ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३४, तेलंगणा १, बुलडाणा १, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
शुक्रवारी बाधित आलेल्या २६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ११, चंद्रपूर तालुका १, भद्रावती २, ब्रम्हपुरी २, सिंदेवाही १, मूल १, गोंडपिपरी २, राजुरा ३, वरोरा २ व कोरपना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमीअधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.