बुके विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:07 IST2019-03-10T22:06:57+5:302019-03-10T22:07:14+5:30
प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कव्हर केलेली बुके विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मनपाच्या पथकाने शहरातील सात बुके विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निर्मुलनासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

बुके विक्रेत्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कव्हर केलेली बुके विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मनपाच्या पथकाने शहरातील सात बुके विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निर्मुलनासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरणे गुन्हा असतानाही शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, ग्लास, वाटींची खुलेआम बाजारात विक्री सुरू आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वापर सुरू आहे. बुके कव्हरसाठीही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. दरम्यान, काही फुल विक्रेते बुके कव्हरसाठी प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाने या फुलविक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. शुक्रवारी गांधी चौक, गोल बाजार, जटपुरा गेट परिसरातील सात व्यावसायिकांवर कारवाई करताना प्लास्टिक कव्हर केलेले ६० बुके जप्त करण्यात आले. प्रत्येक विक्रेत्यांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाचे प्रमुख नामदेव राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे फुलविक्रेत्यंमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मोहिमेचा फज्जा
राज्यात प्लास्टिक बंदी असून चंद्रपूर शहरातही काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून ही मोहिमे थंडावली असून गोलबाजार, बंगाली कॅम्प परिसरात खुलेआम भाजीविक्रेते प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. मात्र यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.