मामा तलावांना निधीचे ग्रहण
By Admin | Updated: August 30, 2015 00:35 IST2015-08-30T00:35:17+5:302015-08-30T00:35:17+5:30
कृषिप्रधान देश असला तरी शेती व त्यासाठी लागणाऱ्या साधनांकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मामा तलावांना निधीचे ग्रहण
रवी जवळे चंद्रपूर
कृषिप्रधान देश असला तरी शेती व त्यासाठी लागणाऱ्या साधनांकडे सातत्याने शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कधी बियाणे टंचाई, कधी खते टंचाई, महागडी कीटकनाशके आणि पिकांवर रोगांचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. शेतीसाठी सुरक्षित सिंचन म्हणून ज्याकडे बघितले जाते, त्या मामा तलावांची अवस्थाही सध्या वाईट झाली आहे. वर्षानुवर्षापासून साठलेल्या गाळाचा उपसा नाही, फुटलेल्या तलावांची दुरुस्ती नाही. यामुळे जिल्ह्यातील १६७८ मामा तलावांपैकी ७० टक्के तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी होऊन धोक्यात आली आहे. तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता ज्या मापदंडानुसार निधी दिला जातो, तो अतिशय तोकडा असल्याने मामा तलावांसारखे सुरक्षित सिंचन सध्या धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय नाजुक झाली आहे. निसर्गाचा कोप तर त्याच्या पाचवीलाच पूजला आहे. एवढे कमी आहे की काय, म्हणून अलिकडे शासनही शेतकऱ्यांवर कोपत असल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून देशाचे उदर भरणारा शेतकरीच उदरनिर्वाहापासून वंचित होऊ लागला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला की बियाणे, खतांची टंचाई होऊ देणार नाही, मुबलक प्रमाणात ते उपलब्ध करू, असे शासन व कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात हंगामात चित्र वेगळे असते. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाला सामोरे जात शेतकरी कसेबसे बियाणे व खतांची जुळवाजुळव करतो. यासाठी त्याला कृषी केंद्रातील लिंकिंगचाही भुर्दंड पेलावा लागतो. हे झाल्यानंतर पुढे पिकांवरील रोगराई व महागडी कीटकनाशके त्याचे कंबरडे मोडून टाकते. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून तो हंगाम सावरत असतानाच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकतो.
आपला कृषिप्रधान देश असल्याने सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या सिंचनाचीच समस्या सर्वाधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊन आत्महत्येसारखा दुबळा मार्ग नाईलाजाने अवलंबत आहे. सिंचनासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प उभारले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित असून काही रखङलेले आहेत. असे असले तरी मामा तलावांचे सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. मामा तलावांना सुरक्षित सिंचन (स्र१ङ्म३ीू३्र५ी ्र११्रँ३्रङ्मल्ल) म्हटले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात १६७८ मामा तलाव आहेत.
यातील ७० टक्के मामा तलावांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना करण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष बुडित क्षेत्रात गाळ साठत आल्यामुळे सद्यस्थितीत सर्व तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी केवळ मोजक्याच तलावातील गाळ उपसला जातो. हे कार्यही अगदी थातूरमातूर असते. त्यामुळे या उपस्याला फारसे महत्त्व नसते.
दोन वर्षांपूर्वी सरासरी ओलांडून मुसळधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील अनेक तलाव फुटले होते. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
१७ व्या शतकातील तलाव
मामा तलावांच्या इतिहासाकडे बघितले असता हे तलाव जवळपास १७ व्या शतकात म्हणजे मालगुजारांच्या काळात बांधण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर १९६४-६५ च्या दरम्यान शासनाकडून या सर्व तलावांची प्रथमत: दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सर्व तलावांची चौफेर दुरुस्ती कधीच झाली नाही.
सिंचाई विभागाकडे निधीच नाही
मामा तलाव हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावांची सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. हे तलाव क्षतिग्रस्त झाल्याचे सिंचाई विभागालाही माहीत आहे. मात्र तलाव दुरुस्तीसाठी शासनाकडून व्यापक निधीच येत नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी तलाव दुरुस्तीसाठी थोडाफार निधी येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सिंचाई विभागातील लेखाधिकारी राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र या निधीने काहीच होत नाही.