हत्याप्रकरणात आरोपी युवकाला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:01+5:302021-03-31T04:28:01+5:30
कर्मवीर वॉर्डात राहणारा विकार अहमद निसार हा चंद्रपूर येथे कायद्याचे शिक्षण घेत होता. ७ मे २०११ रोजी विकार ...

हत्याप्रकरणात आरोपी युवकाला जन्मठेपेची शिक्षा
कर्मवीर वॉर्डात राहणारा विकार अहमद निसार हा चंद्रपूर येथे कायद्याचे शिक्षण घेत होता. ७ मे २०११ रोजी विकार घरी असताना दुपारी मोहसीन अली हारून अली व त्याच्या साथीदाराने घरी जाऊ बोलावले. घरा नजीकच्या कर्मवीर विद्यालयाच्या पटांगणावर नेऊन चाकूने भोसकले. चाकू पाठीच्या डाव्या बाजूला लागल्याने विकार गंभीर जखमी झाला. प्रथम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युपूर्वी विकारचे बयाण पोलिसांनी नोंदविले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. वरोरा पोलिसांनी मोहसिन हारून अली व त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०२, ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस हवालदार दिलीप मेश्राम यांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयात सरकारी पक्षाने १७ साक्षीदार तपासले. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी मोहसीन अली याला जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड आकारला. दंडाची रक्कम मृतकाच्या आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश पारीत केला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील गोविंद उराडे यांनी बाजू मांडली.