कोळसा हाताळणी विभागात अपघात ; चंद्रपूर वीज केंद्रातील एक संच ठप्प, दुसरा आधीच बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:46 IST2025-08-30T13:44:28+5:302025-08-30T13:46:05+5:30
३९ वर्षांनंतर तिसरा संच थांबला : गॅन्ट्री कोसळल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम?

Accident in coal handling department; One unit at Chandrapur power station stalled, another already shut down!
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे दोन वाजता घडली. या अपघातामुळे तिसऱ्या संचातून सध्या वीजनिर्मिती बंद आह; तर चौथा संच आधीपासूनच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे थांबलेला आहे, अशी माहिती महाऔष्णिक केंद्राने शुक्रवारी (दि. २९) दिली.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र कार्यक्षमता उत्कृष्ट ठेवतानाच सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देत आहे; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तीन आणि चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडण्याची घटना घडली.
ही घटना घडल्यानंतर महाऔष्णिक वीज केंद्राने दुरुस्तीसाठी पाऊल उचलले. हे काम लवकरच पूर्ण होऊन संच कार्यान्वित केले जातील, अशी माहिती केंद्राच्या उपमुख्य अभियंता (प्रशासन) विभागाने दिली.
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची एकूण स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॉट असून, यामध्ये ५०० मेगावॉटचे पाच संच आणि २१० मेगावॉटचे दोन संच कार्यरत आहेत. तीन क्रमांकाचा संच १ एप्रिल १९८६, तर चौथा संच ४ नोव्हेंबर १९८६ रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. गेली तब्बल ३९ वर्षे दोन्ही संचांतून अखंड वीजनिर्मिती सुरू होती.