About 172 villages in the district are under the influence of elephant disease | जिल्ह्यातील तब्बल १७२ गावे हत्तीरोगाच्या सावटात

जिल्ह्यातील तब्बल १७२ गावे हत्तीरोगाच्या सावटात

ठळक मुद्देआरोग्य विभागासमोर आव्हान । संबंधित गावात राबविणार विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डासांपासून प्रसार होणाऱ्या आजारपैकी हत्तीरोग (फायलेरिया) हा एक महत्त्वाचा रोग आहे. या रोगाचे वैशिष्ट्ये असे की, ज्या माणसाच्या हातापायांवर अथवा गुप्तांगांवर सुज येत नाही, तोपर्यंत या रोगाची अजिबात कल्पना येत नाही. या रोगाने शरीर विकृत दिसू लागते व हत्तीरोग होतो. जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने हत्तीरोगासाठी संवेदनशिल म्हणून जाहीर केली आहेत.
या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल्यानंतर दुषित अळी डासाने छिद्र केलेल्या जागेतून निरोगी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर त्वचेखालून आपला मार्ग आक्रमित लसीयुक्त ग्रंथीत व कालांतराने पूर्णवस्थेत येवून रूपांतर जंतूमध्ये होते. मानवाचे शरीरात त्यांचे जीवनचक्र ६ ते ७ वर्षेही चालते. जंतुची वाढ रक्तात चालू असताना औषधोपचार केला तर ते नष्ट पावून मरतात व सुज येणे थांबते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या आजाराला १०० टक्के प्रतिबंध घालण्यासाठी येत्या २ ते २० मार्च २०२० पर्यंत विशेष मोहीम सुरू केले जाणार आहे. या कालावधीत विशेष मोहिमेतर्गत मिळणाºया डीईसी व अलबेंडॉझोल या गोळ्यांची एक मात्रा जेवणानंतरच जरूर घ्यावी. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर ताप, डोकेदुखी, उलटी, जुलाब इत्यादी त्रास होण्याची शक्यता असते, त्यामुळे घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व कोणत्याही परिस्थितीत औषधोपचार थांबवू नका, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
हत्तीरोग (लिम्फॅटिक फायलेरीयासिस) या डासांपासून मनुष्याला होणारा आजार आहे. या आजारामुळे रुग्णाचे पाय (अवयव), वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णाला हालचाल करणेही अवघड होवून बसते. मायक्रोफायलेरिया नावाचे कृमी, डासांच्या चाव्याद्वारे निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. ज्यांच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया असतात, त्यांना दूषित रुग्ण असे म्हटल्या जाते. असे व्यक्ती हत्ती रोगाचे संसर्गस्त्रोत असतात. एकदा हत्तीरोग पूर्ण विकसीत झाला की नंतर मात्र त्या रुग्णांच्या रक्तामध्ये जंतू सापडणे कठीण असते. आतापर्यंतच्या तपासणीत जिल्ह्यात ११ हजार ८०० हत्तीरोग रूग्ण आढळले. ही संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आरोग्य प्रशासनाने मोहिमेची तयारी सुरू केली आहे.

हत्तीरोगाची लक्षणे
ताप व कधी कधी थंडी वाजते.
ताप ५ ते ९ दिवस राहतो.
तीव्र स्नायू व सांधेदुधीचा त्रास होतो.
रोगामुळे उग्र स्वरूपात वृषणाच्या
आकारामध्ये वाढ होऊन हत्तीपाय होतो.

हत्तीरोग प्रतिबंधासाठी मोहीम सुरू करण्याबाबत नियोजनाचे निर्देश दिले आहेत. २ ते २० मार्चपासून संबंधित यंत्रणा संवेदनशिल गावांमध्ये जाणार आहे.
- जे.पी. लोंढे,
अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

Web Title: About 172 villages in the district are under the influence of elephant disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.