अबब ! चंद्रपूरकरांनी महिनाभरात रिचवली ६५ काेटींची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:41 IST2021-08-14T11:38:59+5:302021-08-14T11:41:55+5:30
Chandrapur News liquor सहा वर्षांनंतर दारूबंदी उठताच चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यशौकिनांनी महिनाभरात तब्बल ६५ कोटींची दारू रिचवली आहे.

अबब ! चंद्रपूरकरांनी महिनाभरात रिचवली ६५ काेटींची दारू
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अहो, ऐकून नवल वाटेल पण खरे आहे. सहा वर्षांनंतर दारूबंदी उठताच चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यशौकिनांनी महिनाभरात तब्बल ६५ कोटींची दारू रिचवली आहे. दारू दुकाने केव्हा सुरू होतील, याची मद्यपी चातकासारखी वाट बघत होते. अखेर, ५ जुलैपासून परवानाप्राप्त दारू दुकानांतून मद्यविक्री सुरू होताच तळीराम दारू दुकानांवर तुटून पडले होते. अवघ्या महिनाभरात तब्बल १२ लाख २४ हजार ३९० बल्क लीटर इतकी दारू तळीरामांनी ढोसल्याचे पुढे आले आहे.
सर्वाधिक ८ लाख २ हजार १०५ बल्क लीटर देशी दारू तळीरामांनी रिती केली असून पाठोपाठ २ लाख १२ हजार ५५२ बल्क लीटर विदेशी, १ लाख ८८ हजार ७२८ बल्क लीटर स्ट्राँग बीयर व १९ हजार ४१ बल्क लीटर माइल्ड बीयर, तर १ हजार ९६४ बल्क लीटर वाइनचा आनंद लुटला आहे. ५ जुलैला दारूची प्रत्यक्षात परवानाप्राप्त दुकानातून विक्री सुरू झाल्यापासून आजघडीला ३६० दारूची दुकाने सुरू झालेली आहेत. यामध्ये २५० परमिट रूम (बीयर बार), ३२ बीयर शाॅपी, २ क्लब, ४ वाइन शाॅपी व देशी दारूची ७२ दुकाने अधिकृतरीत्या सुरू झाली आहेत. यानुसार सुमारे २९ कोटी ९४ लाख रुपयांची देशी दारू विकली गेली आहे. पाठोपाठ सुमारे २८ काेटी ३४ लाख रुपयांची विदेशी दारू विकली गेली. सुमारे ६ कोटी ५३ लाखांची बीयर विकली गेली, तर १३ लाखांची वाइनही विकली गेली.
चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. येथे कामगार, मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर श्रमपरिहार म्हणून ही मंडळी देशी दारूला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दैनंदिन मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे देशी दारूची सर्वाधिक विक्री झाल्याचे बोलले जात आहे. दारू मूळ किमतीत मिळत असल्यामुळे पिण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे.
लाॅकडाऊनमुळे दारूचे अवैध मार्ग मोकळेच
कोरोनामुळे राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले असले, तरी काही दिवसांपूर्वी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच दारू दुकानांना मुभा होती. या संधीचा फायदा घेत काही अवैध दारू विक्रेत्यांनी दुपारी ४ नंतर अवैधरीत्या दारू विक्री सुरू ठेवली होती. काही बीयर बारमध्ये छुप्या मार्गानेही दारू उपलब्ध होत होती. या वेळी ते अतिरिक्त रक्कम वसूल करीत असल्याचे समजते. आता दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत पार्सल सुविधा उपलब्ध झाल्याने अवैध दारू विक्रेत्यांना चपराक बसली आहे.