आता गावागावांत ‘पढाई भी, सफाई भी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:42+5:30
या अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात दहा असे पंधरा तालुक्यांतील १५० गावांमध्ये नवीन ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही वाचनालयातील पुस्तके वाचण्यासाठी मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना या ग्रंथालयातील पुस्तक स्वयंसेवकांच्या मदतीने मिळणार आहेत.

आता गावागावांत ‘पढाई भी, सफाई भी’
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना वाचनाची तसेच स्वच्छतेची सवय लागावी, साक्षर, सुशिक्षित समाज निर्मिती व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पढाई भी, सफाई भी अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५३९ शाळांमध्ये विविध सुविधा तसेच गावागावांत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
पुढील तीन महिन्यांमध्ये १५० गावांत वाचनालय आणि ५०० शाळांमध्ये सोलर पॅॅनल लावण्याचे टाॅर्गेट जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांतील शौचालयही चकाचक होणार आहे.
या अभियानाकरिता सहाजणांच्या एका अभ्यासगटाची निर्मिती करण्यात आली आहे. ही समिती वाचनालयाचा गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, याबाबत प्रारूप आराखडा तयार करणार आहे. सर्व उपक्रम ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावरील वित्त आयोगाकडून उपलब्ध निधीतून आवश्यक दुरुस्ती करून प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे काही दिवसातच गागावागांत बदल दिसणार आहे.
शौचालयांची होणार दुरुस्ती
- पढाई भी, सफाई भी अभियानांतर्गत पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय, मूत्रीघर नाही, अशा शाळांमध्ये नव्याने बांधकाम तसेच ज्या ठिकाणचे शौचालय, मूत्रीघर मोडकळीत आले आहे, तेथे प्राधान्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १९ शाळांमध्ये शौचालयाची पुर्णात: दुरवस्था झाल्याचेही पुढे आले आहे.
शाळांमध्ये लागणार चाईल्ड हेल्पलाईन
बालकामगार, लैंगिक शोषण, बालकांसोबत गैरवर्तन आणि हिंसा, बालकांची तस्करी, आरोग्य, व्यसन, शिक्षण, बालविवाह, बेघर अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी शासनाने १०९८ क्रमांकाने ही हेल्पलाइन सुरू केली आहे. प्रत्येकाला हा नंबर ठळक अक्षरात दिसेल अशा पद्धतीने शाळांमध्ये लावण्यात येणार आहे.
१५० ग्रंथालय उभारणार
या अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात दहा असे पंधरा तालुक्यांतील १५० गावांमध्ये नवीन ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही वाचनालयातील पुस्तके वाचण्यासाठी मिळणार आहेत. विशेष म्हणजे, सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना या ग्रंथालयातील पुस्तक स्वयंसेवकांच्या मदतीने मिळणार आहेत.
५०० शाळांत लागणार सोलर पॅनल
जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये वीज आहे. मात्र, काही शाळांची वीज बिल न भरल्यामुळे कट केली आहे, तर काही शाळांमध्ये मुख्याध्यापक आपल्या खिशातून वीज बिल भरतात. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्ह्यातील किमान ५०० शाळांमध्ये सोलर पॅनल लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘पढाई भी, सफाई भी’ अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्वच्छतेसोबतच त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये शाळांमध्ये ५०० सोलर पॅनल आणि १५० ग्रंथालये उभारण्याचे टार्गेट समोर ठेवण्यात आले आहे.
-डाॅ. मिताली सेठी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर