भरधाव ट्रकची बसला धडक; गडचिरोलीच्या तरुणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:06 PM2022-12-30T13:06:18+5:302022-12-30T13:07:29+5:30

मूलजवळील घटना; फरार ट्रक चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू

A speeding truck collided with a bus; Gadchiroli girl died on the spot | भरधाव ट्रकची बसला धडक; गडचिरोलीच्या तरुणीचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची बसला धडक; गडचिरोलीच्या तरुणीचा जागीच मृत्यू

googlenewsNext

मूल (चंद्रपूर) : शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर मूल - चंद्रपूर मार्गावर ट्रक-बसची भीषण धडक बसून बसमधील एक तरुणी जागीच ठार झाली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावर ट्रक सोडून फरार झाला. तेजस्विनी नारायण कोडवते (२४) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एकलपूर (ता. वडसा, जि. गडचिरोली) येथील रहिवासी आहे. गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे (एमएच ४०, वाय ५८०७) या क्रमांकाची बस जात होती. तर चंद्रपूरवरून मूलकडे (सीजी ०७, बीपी ४०२७) या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत होता.

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, तरुणीचा डावा हात तुटून रस्त्यावर पडला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रक चालकाविरुद्ध मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत करत आहेत.

पोलिसांवर नागरिकांचा रोष

हा अपघात मूल शहरापासून हाकेच्या अंतरावर झालेला असतानाही पोलिस तासाभरानंतर पोहोचले. यावेळी जखमी प्रवाशांना मदत करत असलेल्या नागरिकांनाच काठीने बदडल्याने पोलिसांविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. अपघातग्रस्त घटनास्थळ हे गडचिरोली - चंद्रपूर महामार्गावर असून, यादरम्यान वाहतूक पोलिसांची दोन वाहने गेली. या वाहनांना प्रवाशांनी अपघात झाला असून, थांबून मदत करण्याची विनंती केली. मात्र, वाहतूक पोलिसांनी मदत तर सोडाच थांबण्याचेही सौजन्य न दाखविल्याने वाहतून पोलिसांनी संवेदनशून्यतेचा परिचय दिला. त्यामुळे सामान्य नागरिकांनी मदतीची अपेक्षा कुणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: A speeding truck collided with a bus; Gadchiroli girl died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.