चंद्रपुरातील ९० इंटर्न डॉक्टर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:07+5:302021-05-05T04:46:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९० इंटर्न डॉक्टरांनी मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून पाच दिवसांचा संप ...

चंद्रपुरातील ९० इंटर्न डॉक्टर संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९० इंटर्न डॉक्टरांनी मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून पाच दिवसांचा संप पुकारला आहे. ऐन कोरोनाच्या संकटात ९० डॉक्टरांनी संप पुकारल्याने रुग्णांचे हाल होणार असून, इतर डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढणार आहे. या संदर्भातील निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातांना दिले आहे.
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सन २०१६च्या बॅचमधील ९० इंटर्न डॉक्टर नुकतेच सेवेत रुजू झाले आहेत. कोरोनासारख्या संकटात हे डॉक्टर प्रामाणिकपणे सेवा देत असताना, या डॉक्टरांना राज्यातील इतर इंटर्न डॉक्टरांच्या तुलनेत तटपुंजे मानधन देण्यात येत आहे. त्यामुळे हे मानधन ५० हजार रुपये करण्यात यावे, यासोबतच गतवर्षी राज्य सरकारने इंटर्न डॉक्टरांना लागू केलेला ५० लाखांचा विमा रद्द केला आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची सेवा बजावताना बरेवाईट झाल्यास कुठलीही सुरक्षितता नाही. त्यामुळे विमा कवच देण्यात यावे. कोविड रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या इंटर्नसाठी बेड आरक्षित ठेवावेत, आदी मागण्यांसाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ९० इंटर्न डॉक्टरांनी सोमवारपासून पाच दिवसांचा संप पुकारला असून, आपल्या मागण्यांचे निवेदन अधिष्ठातांना दिले आहे.